पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 06:41 IST2025-05-22T06:39:14+5:302025-05-22T06:41:15+5:30
या हल्ल्यात आणखी ३८ जखमी झाले आहेत. भारताशी संबंधित गटांनी हा हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कर व त्या देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. तो भारताने फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. (वृत्तसंस्था)

पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी
इस्लामाबाद/कराची : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील खुझदार जिल्ह्यात बुधवारी शाळेच्या बसवर आत्मघाती हल्ला झाला. या भीषण घटनेत किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.
या हल्ल्यात आणखी ३८ जखमी झाले आहेत. भारताशी संबंधित गटांनी हा हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कर व त्या देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. तो भारताने फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
भारतावरही बिनबुडाचे आराेप
खुझदार येथील हल्ला भारताचा पाठिंबा असलेल्या गटांनी केला, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. पाकिस्तानचे आरोप फेटाळताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, बिनबुडाचे आरोप करण्याची पाकिस्तानला सवय आहे. पाकिस्तान हे दहशतवादी कारवायांचे मुख्य केंद्र असल्याची प्रतिमा झाकण्यासाठी तो देश असे आरोप करत असतो.
चोलिस्तान कालव्यावरून संघर्ष पेटला
चोलिस्तान कालवा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिंध प्रांतातील सरकार व पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. सिंधू नदीवर सहा कालवे बांधून चोलिस्तानच्या वाळवंटी भागात सिंचनासाठी पाणी पोहोचविण्याचा शरीफ सरकारचा विचार आहे. मात्र, सिंधमधील स्थानिक राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, कार्यकर्ते व वकिलांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे.