"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:14 IST2025-12-22T13:11:13+5:302025-12-22T13:14:50+5:30
बोंडी बीचवर १४ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण हल्ल्याचा मुख्य आरोपी साजिद अकरम याच्या पत्नीने त्याचा मृतदेह स्वीकारण्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास स्पष्ट नकार दिला.

"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील बोंडी बीचवर १४ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण हल्ल्याचा मुख्य आरोपी साजिद अकरम याच्या पत्नीने त्याचा मृतदेह स्वीकारण्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. साजिदच्या पत्नीने म्हटलं की, "माझा साजिद अकरमशी आता कोणताही संबंध नाही." पत्नीच्या या भूमिकेनंतर साजिदचा मृतदेह सध्या ऑस्ट्रेलियन सरकारच्या ताब्यात असून त्याचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आता सरकारी अधिकाऱ्यांना पार पाडावी लागणार आहे.
५० वर्षीय साजिद अकरम हा 'इसिस'कडून प्रेरित होऊन केलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. या भीषण हल्ल्यात एका लहान मुलासह किमान १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. साजिदचा २४ वर्षांचा मुलगा नवीद अकरम याला घटनेच्या वेळी अटक करण्यात आली असून तो सध्या रुग्णालयात पोलीस देखरेखीखाली उपचार घेत आहे.
हल्ल्याचा कट आणि तपास
पोलीस तपासात समोर आलं आहे की, साजिद १ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान फिलिपाइन्समधील दावो शहरात गेला होता. हे शहर इस्लामिक स्टेटच्या कारवायांसाठी ओळखलं जातं. तिथे त्याने दहशतवादी ट्रेनिंग घेतल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याच काळात सिडनीतील इतर दोन व्यक्तीही त्याच भागात उपस्थित होत्या, ज्यांची आता चौकशी सुरू आहे.
खोटं बोलून केला हल्ला
हल्ल्यापूर्वी साजिद आणि त्याच्या मुलाने कुटुंबीयांना 'जर्विस बे' येथे मासेमारीसाठी जात असल्याचं खोटे सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी कॅम्पबेल परेडजवळील पादचारी पुलावरून बेछूट गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात ज्यूंच्या 'चानूका बाय द सी' फेस्टिव्हलमध्ये सहभागी नागरिक, स्थानिक आणि पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं. हल्लेखोरांच्या गाडीतून आयईडी (IED) स्फोटकंही जप्त करण्यात आली आहेत.