मोठी बातमी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न, इराणने तीन तेल जहाजे पाठवली परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 18:08 IST2026-03-27T18:07:20+5:302026-03-27T18:08:08+5:30
होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जहाजांना इराणने परत पाठवले. ही तीन जहाजे परवानगी देण्यात आलेल्या जहाजांच्या मार्गावरून पुढे येत होती.

मोठी बातमी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न, इराणने तीन तेल जहाजे पाठवली परत
पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाल्यापासून होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल-गॅस वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. मोजक्या देशांच्या जहाजांना परवानगी असताना होर्मुझ सामुद्रधुनीत एक महत्त्वाची घटना घडली. इराणने माहिती दिली की, होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या तीन जहाजांना परत पाठवण्यात आले आहे.
इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोरने दावा केला की, आज (२७ मार्च) सकाळी तीन जहाजे अशा मार्गावरून होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करत होती, ज्या मार्गाचा वापर फक्त परवानगी दिलेल्या जहाजांकडून केला जात आहे.
वेगवेगळ्या देशांचे तीन वेगवेगळी जहाजे परवानगी देण्यात आलेल्या जहाजांचा मार्गाकडे येत होते. इराणच्या नौदलाने त्या जहाजांना इशारा दिला आणि त्यानंतर ही तीन जहाजे परत पाठवण्यात आली.
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबद्दल काय म्हटलंय?
इराणच्या लष्कराने म्हटले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनी बंद आहे आणि कोणत्याही जहाज पार करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अमेरिका आणि इस्रायलच्या सहकारी देशांच्या बंदरांवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या जहाजांना कोणत्याही रस्त्याने जाण्याची परवानगी नाही.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी दोन दिवसांपूर्वीच सरकारी वृत्तवाहिनीवर म्हटले होते की, इराणने आतापर्यंत चीन, रशिया, पाकिस्तान, इराक आणि भारत या देशांच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी दिली आहे. ही सामुद्रधुनी पूर्णपणे बंद नाहीये, फक्त शत्रू देशासाठीच बंद आहे.