बेंगळुरू-पॅरिस विमानाचे तुर्कमेनिस्तानात आणीबाणीचे लँडिंग! हवेतच इंजिन निकामी झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 09:22 IST2026-01-14T09:17:51+5:302026-01-14T09:22:25+5:30
विमानाचे इंजिन हवेतच निकामी झाल्यामुळे हे विमान तातडीने तुर्कमेनिस्तानमधील अशगाबात विमानतळाकडे वळवण्यात आले.

बेंगळुरू-पॅरिस विमानाचे तुर्कमेनिस्तानात आणीबाणीचे लँडिंग! हवेतच इंजिन निकामी झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला
बेंगळुरूहून पॅरिसला जाणाऱ्या एअर फ्रान्सच्या एका विमानाला भीषण अपघातातून बचवण्यात थोडक्यात यश आले आहे. विमानाचे इंजिन हवेतच निकामी झाल्यामुळे हे विमान तातडीने तुर्कमेनिस्तानमधील अशगाबात विमानतळाकडे वळवण्यात आले. या तांत्रिक बिघाडामुळे विमानातील प्रवाशांना तब्बल १५ तासांहून अधिक काळ विमानतळावर ताटकळत राहावे लागले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.
नेमकी घटना काय?
एअर फ्रान्सचे फ्लाईट AF191A या बोईंग ७७७ विमानाने सोमवारी रात्री ११:२२ वाजता बेंगळुरू येथून पॅरिससाठी उड्डाण केले होते. मात्र, प्रवासादरम्यान विमानातील दोनपैकी एका इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. वैमानिकाने प्रसंगावधान राखत कंपनीच्या निर्देशानुसार विमान जवळच्या तुर्कमेनिस्तानमधील अशगाबात विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी पहाटे ३:३७ वाजता विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले.
प्रवाशांचा १५ तास विमानतळावर खोळंबा
विमान सुरक्षित उतरले असले तरी प्रवाशांच्या अडचणी संपल्या नव्हत्या. तुर्कमेनिस्तानच्या कडक प्रवेश नियमांमुळे प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुरुवातीला बराच वेळ विमानातच बसून राहावे लागले. त्यानंतर विमानतळ प्रशासनाच्या मदतीने त्यांना जवळील हॉटेल्समध्ये हलवण्यात आले. प्रवाशांनी सोशल मीडियावरून आपला संताप व्यक्त केला असून, १५ तासांहून अधिक काळ ते पुढील प्रवासाच्या प्रतीक्षेत होते.
एअर फ्रान्सचे स्पष्टीकरण
या घटनेबाबत एअर फ्रान्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, "विमानातील तांत्रिक बिघाडामुळे सुरक्षा नियमांचे पालन करत विमान डायव्हर्ट करण्यात आले होते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने एक विशेष विमान अशगाबातला पाठवण्यात आले आहे. हे विमान प्रवाशांना घेऊन १४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २:४० वाजता पॅरिसला पोहोचेल अशी अपेक्षा आहे."
मोठी दुर्घटना टळली
सुदैवाने, विमानाचे इंजिन निकामी झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या विमानात किती प्रवासी होते याचा आकडा स्पष्ट झाला नसला तरी, बोईंग ७७७ ची क्षमता पाहता शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात होते. विमान कंपनीने या संपूर्ण घटनेबद्दल आणि प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.