भारताच्या खास मित्राशी बांगलादेशने केली ऐतिहासिक डील; व्यापार जगात पहिल्यांदाच घडलं असं काही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:05 IST2026-02-07T16:03:34+5:302026-02-07T16:05:50+5:30
भारताचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू मित्र मानल्या जाणाऱ्या देशासोबत आता बांगलादेशने एक असा करार केला आहे, जो दोन्ही देशांच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे.

भारताच्या खास मित्राशी बांगलादेशने केली ऐतिहासिक डील; व्यापार जगात पहिल्यांदाच घडलं असं काही!
जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भारताचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू मित्र मानल्या जाणाऱ्या जपानसोबत आता बांगलादेशने एक असा करार केला आहे, जो दोन्ही देशांच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. युनूस सरकारच्या नेतृत्वाखाली बांगलादेशनेजपानसोबत 'आर्थिक भागीदारी करार' करून केवळ व्यापाराचे दरवाजेच उघडले नाहीत, तर आशियाई राजकारणात आपली पकड मजबूत करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, अशा प्रकारचा हा पहिलाच ऐतिहासिक करार असून तो अत्यंत कमी वेळात पूर्ण करण्यात आला आहे.
नेमका करार काय आणि फायदा कोणाला?
जपानच्या राजधानीत म्हणजेच टोक्योमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे बांगलादेशला जपानच्या बाजारपेठेत 'ड्युटी-फ्री' प्रवेश मिळणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा बांगलादेशच्या कापड उद्योगाला होईल. आता बांगलादेशात तयार झालेले कपडे कोणत्याही कराशिवाय जपानच्या दुकानांमध्ये दिसतील.
वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशची ७,३७९ उत्पादने जपानमध्ये करमुक्त असतील, तर जपानची १,०३९ उत्पादने बांगलादेशात याच सवलतीसह येतील. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार कित्येक पटीने वाढण्याची शक्यता आहे.
विक्रमी ४ वर्षात प्रक्रिया पूर्ण
साधारणपणे दोन देशांमधील असे मोठे आर्थिक करार पूर्ण व्हायला दशके लागतात. मात्र, बांगलादेश आणि जपानने केवळ ४ वर्षात ही प्रक्रिया पूर्ण करून जगाला चकित केले आहे. २०२२ मध्ये दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाली होती, तेव्हा या कराराची ठिणगी पडली होती. त्यानंतर २०२४ आणि २०२५ मध्ये वेगाने झालेल्या सात चर्चेच्या फेऱ्यांनंतर यावर शिक्कामोर्तब झाले.
गुंतवणूक आणि रोजगाराची लाट येणार
हा करार केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीपुरता मर्यादित नाही. जपान आता बांगलादेशात तंत्रज्ञान हस्तांतरण आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. सेवा क्षेत्रातही बांगलादेशने जपानसाठी ९७ उप-क्षेत्रे खुली केली आहेत, तर जपानने बांगलादेशसाठी १२० उप-क्षेत्रांचे दरवाजे उघडले आहेत. यामुळे बांगलादेशातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान त्यांच्या हाती येईल.
तज्ज्ञांचे मत: बांगलादेशची नवी झेप
गारमेंट इंडस्ट्री असोसिएशनचे माजी संचालक मोहिउद्दीन रुबेल यांनी या कराराचे स्वागत केले आहे. ते म्हणतात, "एका विकसित देशाशी इतका गुंतागुंतीचा करार इतक्या कमी वेळात करणे ही बांगलादेशच्या मुत्सद्देगिरीची मोठी विजयाची गाथा आहे. यामुळे बांगलादेशची विश्वासार्हता जगात वाढली असून, भविष्यात इतर विकसित देशांसोबतही असे करार करणे सोपे होईल."