इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 20:39 IST2026-01-14T20:38:40+5:302026-01-14T20:39:23+5:30
मागील हल्ल्यावेळीही ऑपरेशन सुरू करण्याच्या काही तास आधी या विमानानं उड्डाण घेतले होते.

इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
तेहरान - इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक राजकारण चांगलेच पेटले आहे. पश्चिम आशियापासून उत्तरेपर्यंत घडणाऱ्या घटना पाहून मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत मिळत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं विशेष विमान 'विंग ऑफ सियोन'नं अचानक उड्डाण घेतले आहे. ही घटना इराणवरील हल्ल्यापूर्वीचं पहिले पाऊल म्हणून पाहिले जात आहे. दुसरीकडे अमेरिकेने कतार येथील त्यांच्या सर्वात मोठा सैन्य तळावरील कर्मचाऱ्यांना हटण्याचे आदेश दिले आहेत. जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्हीही हल्ला करू अशी इराणने थेट धमकी दिली आहे. त्यातच ग्रीनलँडबाबत ट्रम्प यांच्या विधानानं खळबळ माजली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा आणि गोल्डन डोम प्रकल्पासाठी महत्त्वाचे असल्याचं म्हटलं. ग्रीनलँड अमेरिकेच्या हातात असणे हा एकमेव पर्याय आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यात अमेरिका आणि इराण यांच्यातही तणाव वाढला आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अधिकृत विमानाचं उड्डाण याकडे अनेकांनी लक्ष वेधले. हे विमान केवळ काही क्षणासाठी हवेत होते, मागील हल्ल्यावेळीही ऑपरेशन सुरू करण्याच्या काही तास आधी या विमानानं उड्डाण घेतले होते. त्याचा थेट अर्थ इराणविरोधात एखादी मोठी कारवाई जवळ आली आहे असं विश्लेषकांनी म्हटलं आहे. नेतन्याहू यांच्या विमानाचं नाव विंग ऑफ सियोन आहे. हे इस्रायली प्रमुखांचे अधिकृत सरकारी विमान आहे. ऑक्टोबरमध्ये हल्ल्याआधीही याचप्रकारे या विमानाने हवेत उड्डाण घेतले होते. या विमानाच्या हालचालींवर जगातील अनेक सुरक्षा तज्ज्ञांचे लक्ष असते.
५० टार्गेट हिट लिस्ट तयार
माहितीनुसार, अमेरिकन थिंक टँकने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना ५० ठिकाणांची गोपनीय यादी सोपवली आहे. या हिट लिस्टमध्ये इराणमधील रिवोल्यूशनरी गार्डसचं सर्वात महत्त्वाचं मुख्यालय यांचाही समावेश आहे. तेहरानचं थारुल्लाह हेडक्वार्टरही या यादीत सर्वात वर आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे आंदोलनकर्त्यांविरोधात कारवाईचं मुख्य केंद्र आहे. तेहरानच्या चार मुख्यालयाचा समावेश आहे. कुद्स सब हेडक्वार्टर, फतह सब हेडक्वार्टर, गदर मुख्यालय यासह आणखी २३ ठिकाणे अमेरिकेच्या टार्गेटवर आहेत.
दरम्यान, अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच इराणमधील आंदोलनकर्त्यांना मदत मार्गावर आहे असं म्हटले होते. लोकांची हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलं होते. सीनेटर टॉम कॉटन यांनीही इराणी शासनची तुलना गंभीर आजाराशी केली. त्यात ट्रम्प यांनी कतार येथील अमेरिकन कर्मचाऱ्यांना सैन्य तळ सोडण्याचा आदेश दिला आहे. हा मिडिल ईस्टमधील सर्वात मोठा सैन्य तळ मानला जातो. याठिकाणी सामान्यपणे १० हजार अमेरिकन सैन्य तैनात असते. हा बेस खाली करणे एखाद्या मोठ्या युद्धाच्या तयारीचा हिस्सा असू शकते. इराणने मागील वर्षी अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना याच कतारच्या बेसवर प्रतिहल्ला केला होता.