जगभर: वेंडी फेथ आणि एलेसी डायना डेनिस; त्या दोघींच्या चुंबनानं हादरला अख्खा देश, समाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 07:53 IST2026-02-28T07:52:57+5:302026-02-28T07:53:57+5:30
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं जगातल्या सगळ्यात क्रूर समजल्या जाणाऱ्या 'अँटि-होमोसेक्शुअॅलिटी कायद्या' अंतर्गत या दोन्ही तरुणींना अटक केली.

जगभर: वेंडी फेथ आणि एलेसी डायना डेनिस; त्या दोघींच्या चुंबनानं हादरला अख्खा देश, समाज
२२ वर्षांची संगीतकार वेंडी फेथ. 'टोरेरो बे' या नावानंही ती ओळखली जाते आणि २१ वर्षाची एलेसी डायना डेनिस या दोघी 'मैत्रिणी'. परवाचीच गोष्ट. या दोघींनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकींचं चुंबन घेतलं आणि संपूर्ण देशात अक्षरशः हाहाकार उसळला. म्हटलं तर ही एक अगदी छोटीशी घटना, पण या घटनेनं युगांडा या देशाच्या हुकूमशाही सरकारला मुळापासून हादरवलं. या एका 'किस'नं संपूर्ण देशाची सत्ता आणि समाज दोन्हीही थरारलं. सरकार इतकं भयभीत झालं की या गुन्ह्यासाठी चक्क जन्मठेपेची शिक्षा ठरवण्यात आली!
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं जगातल्या सगळ्यात क्रूर समजल्या जाणाऱ्या 'अँटि-होमोसेक्शुअॅलिटी कायद्या' अंतर्गत या दोन्ही तरुणींना अटक केली. आता कदाचित त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य तुरुंगात गजाआड घालवावं लागू शकतं.
पोलिसांनी दोघींना त्यांच्या भाड्याच्या खोलीवर 'रेड' टाकून अटक केली. पोलिसांचं म्हणणं आहे, आम्हाला 'खबर' मिळाली होती की या दोन्ही संशयित तरुणी एका विचित्र आणि समलैंगिक कृत्यांत सहभागी आहेत. त्यांना दिवसाढवळ्या एकमेकींना चुंबन देताना पाहिलं गेलं.
पोलिसांचं असंही म्हणणं आहे की, त्यांच्या घरी अनेक इतर महिला वारंवार येत होत्या. या 'गुप्त' माहितीच्या आधारावर पोलिसांनी दोघींवर समलैंगिकतेचा आरोप ठेवला आणि त्यांना गजाआड पाठवलं.
युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी मे २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय विरोधाला आणि संतापाला न जुमानता अँटि-होमोसेक्शुअॅलिटी कायद्यावर स्वाक्षरी केली होती. हा कायदा जगातल्या सगळ्यात कठोर आणि अमानवी LGBTQ विरोधी कायद्यांपैकी एक मानला जातो.
या अटकेमुळे युगांडात आधीच घाबरलेल्या LGBTQ समुदायात अक्षरशः दहशत पसरली आहे. 'सेक्सुअल मायनॉरिटीज युगांडा' (Smug) चे कार्यकारी संचालक फ्रैंक मुगिशा यांनी या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त करताना म्हटलं आहे, ही घटना अन्यायकारक आहे. लोकांना केवळ त्यांची 'ओळख' किंवा नातेसंबंधांच्या आधारावर लक्ष्य केलं जात आहे, अटक केली जात आहे. खोट्या आरोपांची भीती दाखवून LGBTQ समुदायातील सदस्यांकडून पैसे उकळले जात आहेत.
मानवाधिकार संघटनांनीही याबाबत खेद आणि नाराजी व्यक्त केली आहे. ह्युमन राइट्स अवेअरनेस अँड प्रमोशन फोरमनं जानेवारीत दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, हा कायदा लागू झाल्यापासून LGBTQ लोकांना लक्ष्य करणाऱ्या ९५६ घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे १,२७६ व्यक्ती थेट प्रभावित झाल्या आहेत.
युगांडातील समलैंगिक हक्क कार्यकर्ते हंस सेनफुमा यांचं दुःख तर त्यांच्या शब्दांतून स्पष्टपणानं जाणवतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, युगांडात आमचा समुदाय सध्या फक्त घाबरलेला नाही, तर आम्ही अक्षरशः शोक करीत आहोत. आम्ही त्या स्वातंत्र्याचा शोक करत आहोत, जे आम्हाला कधीच मिळालं नाही. आम्ही त्या दोन तरुण मुलींसाठी दुःखी आहोत, ज्यांनी काहीही चुकीचं केलं नाही. समुदायातील सगळेच जण प्रचंड हादरले आहेत.
आज हजारो युगांडावासी शांतपणानं आपल्या फोनमधून ते 'संदेश' डिलीट करत आहेत, जे त्यांना तुरुंगात पाठवू शकतात. भीतीमुळे आपल्या जवळच्या लोकांपासून ते दूर जात आहेत आणि जिवंत राहण्यासाठी 'आम्ही समलिंगी नाहीत' असं नाटक करायला त्यांना भाग पडलं आहे.