जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 09:07 IST2025-12-04T09:06:25+5:302025-12-04T09:07:27+5:30
आपली प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा, आपल्यावर हक्क गाजवण्याचा तो प्रयत्न करतोय. इतकं की तिनं काय करावं, काय करू नये, कोणाशी बोलावं, कोणाशी बोलू नये, याबाबतही त्याची जबरदस्ती सुरू झाली.

जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला !
२२ वर्षांची गुलिया सिकेटिन. इटलीतील एका कॉलेजमध्ये बायोमेडिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण ती घेत होती. याच कॉलेजमध्ये याच विषयाचं शिक्षण घेणाऱ्या फिलिपो तुरेटा या तरुणावर तिचं प्रेम बसलं.
दोघांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम. इतकं की दोघांनाही एकमेकांशिवाय करमेना. एकतर कायम सोबत, नाहीतर मोबाइलच्या चॅटिंगवर. दोघांना लग्नही करायचं होतं. पण, काही दिवसांनंतर गुलियाच्या लक्षात आलं, फिलिपो आपल्याबाबत फारच पझेसिव्ह झाला आहे. आपली प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा, आपल्यावर हक्क गाजवण्याचा तो प्रयत्न करतोय. इतकं की तिनं काय करावं, काय करू नये, कोणाशी बोलावं, कोणाशी बोलू नये, याबाबतही त्याची जबरदस्ती सुरू झाली.
नंतर तर त्यानं तिला तिच्या मित्र-मैत्रिणींना भेटायलाही बंदी घातली आणि तिच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींवर राग-राग करायला सुरुवात केली. तिची घुसमट होऊ लागली. नात्यातलं प्रेमही हळूहळू ओसरू लागलं. शेवटी तिनं हे नातं पुढे चालवण्यास त्याला स्पष्टपणे नकार दिला.
गुलियाचा हा नकार फिलिपोला सहन झाला नाही. सुरुवातीला तर त्यानं तिचा पिच्छा सोडला नाही, पण गुलिया दाद देत नाही म्हटल्यावर तो चिडला आणि एके दिवशी त्यानं तिच्यावर चाकूचे वार करून तिला संपवलं. त्यानं तिच्यावर चाकूचे तब्बल ७० वार केले. ती मृत झाल्यानंतरही तिच्यावर चाकूचे वार तो करतच होता. गुलियानं मृत्यूपूर्वी एक यादी बनवली होती, ज्यात तिनं लिहिलं होतं की तिचा बॉयफ्रेंड फिलिपो तिला कशाप्रकारे त्रास देत होता, तिला कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता ते.
साधारण दोन वर्षांपूर्वीची ही घटना. या घटनेमुळे अख्खं इटली हादरलं. लोकांनी आंदोलनं केली. महिलांच्या हत्येचा आणि त्यांच्यासंदर्भात इतरांच्या वागणुकीचा धिक्कार केला. महिलांच्या सन्मानाची आणि ‘फेमिसाइड’ला कायदेशीर मान्यता देण्याच्या मागणीचा जोर देशात वाढत गेला.
महिलांच्या हत्येला स्वतंत्र अपराध मानून समाजात जागरूकता वाढवली जावी आणि अशा घटनांना अधिक गांभीर्यानं हाताळलं जावं, यासाठी इटलीचे रस्ते आंदोलनांनी भरून गेले.
सरकारलाही अखेर याची दखल घ्यावी लागली. इटलीत जर कोणत्याही महिलेला फक्त ती महिला आहे, म्हणून मारलं गेलं, तिच्यावर अत्याचार झाला, तर त्या गुन्ह्याला आता स्वतंत्र आणि गंभीर अपराध मानलं जाईल. इटलीच्या संसदेनं यासंदर्भात नुकताच एक क्रांतिकारी कायदा पास केला आहे. सरकार आणि विरोधक दोघांनीही याला समर्थन दिलं. या नवीन कायद्यानुसार आरोपीला किमान जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल.
यासंदर्भात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी म्हणतात, त्या असा देश बनवू इच्छितात जिथं कोणत्याही महिलेला असुरक्षित किंवा एकटं वाटू नये. महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या सन्मानासंदर्भातील कायदे आणखी कडक केले जातील. या नव्या कायद्यामुळे मेक्सिको आणि चिलीनंतर आता इटलीही त्या काही निवडक देशांमध्ये सामील झाला आहे जिथे ‘फेमिसाइड’ला गंभीर अपराध मानलं जातं.
याच कारणामुळे इटलीच्या संसदेत आणखी एका कायद्यावर चर्चा चालू आहे. त्याच्या मसुद्यात म्हटलं आहे, महिलेच्या सहमतीशिवाय कोणी तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले, तर त्याला थेट बलात्कार मानलं जाईल. काही राजकीय पक्षांचा याला विरोध आहे, पण यासंदर्भात चर्चा सुरू आहे.