अमेरिकेने जप्त केलेल्या रशियन तेलवाहू जहाजात 3 भारतीय अडकले, कुटुंबीयांनी PM मोदींना मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:40 IST2026-01-12T17:40:13+5:302026-01-12T17:40:22+5:30
अमेरिकेने अटक केलेल्या क्रु मेंबर्सपैकी रक्षित चौहानचे पुढील महिन्यात लग्न; कुटुंबीय तीव्र चिंतेत...

अमेरिकेने जप्त केलेल्या रशियन तेलवाहू जहाजात 3 भारतीय अडकले, कुटुंबीयांनी PM मोदींना मागितली मदत
America-Venezuela : अमेरिकेच्या व्हेनेजुएलावरील कारवाईमुळे हिमाचल प्रदेशातील एक कुटुंब अडचणीत आले आहे. अमेरिकेने अलीकडेच रशियन झेंडा असलेले तेलवाहू जहाज जप्त केले. या जहाजावर हिमाचल प्रदेशातील 26 वर्षीय मर्चंट नेव्ही अधिकारी रक्षित चौहान कार्यरत आहेत. रक्षित यांचे पुढील महिन्यात लग्न असून, आता कुटुंबीय त्यांच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंतेत आहेत. कुटुंबीयांनी रक्षितला सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.
अमेरिकेची कारवाई आणि टँकर जप्ती
व्हेनेझुएलाच्या तेलवाहतुकीशी संबंधित प्रकरणात अमेरिकेने 7 जानेवारी रोजी उत्तर अटलांटिक महासागरात रशियन झेंडा असलेले ‘मॅरिनेरा’ हे तेलवाहू जहाज जप्त केले. या जहाजावरील चालक दलात तीन भारतीय नागरिकांचा समावेश आहे.
पहिल्याच असाइनमेंटवर व्हेनेझुएलात
रक्षित चौहान यांना त्यांच्या रशियन कंपनीने पहिल्याच समुद्री असाइनमेंटसाठी व्हेनेझुएलाला पाठवले होते. ते 28 सदस्यांच्या चालक दलासह या टँकरवर कार्यरत होते. कुटुंबीयांनी सांगितले की, जहाजाला सीमेजवळ सुमारे 10 दिवस थांबवण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने जहाज परत बोलावले, मात्र त्याच दरम्यान अमेरिकन अधिकाऱ्यांनी ते जप्त केले.
19 फेब्रुवारीला लग्न
रक्षित यांची आई रीता देवी यांनी पंतप्रधानांकडे मदतीची मागणी केली. माझा मुलगा सुरक्षित परत यावा, हीच आमची मागणी आहे. 19 फेब्रुवारीला त्याचे लग्न ठरले आहे. 7 जानेवारीनंतर त्याच्याशी आमचा कोणताही संपर्क झालेला नाही, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, पालमपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधानांसह परराष्ट्र मंत्र्यांनाही विनंती केली की, या टँकरवरील गोवा आणि केरळमधील इतर दोन भारतीयांचीही सुरक्षित सुटका करण्यात यावी.
2025 मध्ये मर्चंट नेव्हीत प्रवेश
रक्षित चौहान यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी मर्चंट नेव्हीत प्रवेश केला होता. त्यांचे वडील रंजीत सिंग चौहान यांनी सांगितले की, रशियन कंपनीने रक्षित यांना व्हेनेझुएलातून तेल घेण्यासाठी पाठवले होते. मात्र परिस्थिती अचानक बदलल्याने संपूर्ण चालक दल अडचणीत सापडला आहे.
चालक दलातील सर्व सदस्य ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजात एकूण 28 खलाशी होते, त्यात 3 भारतीय, 20 युक्रेनियन, 6 जॉर्जियन आणि 2 रशियनचा समावेश आहे. सध्या चालक दलातील सर्व सदस्य अटक असल्याची माहिती आहे.