Afghanistan- Pakistan Conflict: इस्रायल- इराण युद्धादरम्यान तालिबानचा पाकिस्तानवर मोठा हल्ला, कंधार सीमेवरील चौक्या हिसकावल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:55 IST2026-03-04T14:53:11+5:302026-03-04T14:55:21+5:30
Afghanistan- Pakistan Conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. तालिबानने कंधार सीमेवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर आणि पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केल्यानंतर, पाकिस्तानने आता अधिकृतपणे युद्धाची घोषणा केली.

AI Image
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळत असताना अफगाणिस्तानवर सत्ता गाजवणाऱ्या तालिबानने पाकिस्तानवर मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली. तालिबानच्या सैन्याने कंधार सीमावर्ती भागात झुल्म-ए-लाल ऑपरेशन राबवून पाकिस्तानी लष्कराच्या तब्बल सात चौक्या ताब्यात घेतल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धयुद्ध घोषित केले आहे.
अफगाण संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या २०५ व्या अल-बद्र कॉर्प्सच्या ६ व्या बॉर्डर उबैदाह ब्रिगेडने पाकिस्तानवर हल्ला केला. तसेच पाकिस्तानी सैनिकांना मागे ढकलत कंधार सीमेवरील ७ चौक्यांवर आपला ताबा मिळवला. या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा किंवा जखमी झाल्याचा दावाही अफगाणिस्तानने केला आहे.
در شب ۱۳ ماه حوت، در جریان عملیات «ردالظلم»، نیروهای دفاعی مربوط به لوای ششم سرحدی عبیده از قولاردوی ۲۰۵ البدر کندهار، ۷ پوسته رژیم نظامی پاکستان را بهگونهای کامل فتح کردند که در نتیجهٔ آن دهها تن از عساکر کشته و زخمی شدند... pic.twitter.com/Cg5Q7EzdVT
— د ملي دفاع وزارت - وزارت دفاع ملی (@MoDAfghanistan2) March 4, 2026
तालिबानच्या दाव्यानुसार, दोन मोठे लष्करी तळ आता पूर्णपणे अफगाणिस्तानच्या नियंत्रणाखाली आले आहेत. सीमावर्ती भागातील सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या धमक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे अफगाण संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. दरम्यान, २०१ व्या खालिद बिन अल-वालिद आर्मी कॉर्प्सच्या दुसऱ्या बॉर्डर ब्रिगेडने सीमेवर घिरट्या घालणारे पाकिस्तानी लष्कराचे एक ड्रोन पाडल्याचा दावा सोशल मीडियाद्वारे केला आहे.
पाकिस्तानचा अफगाणिस्तानला इशारा
याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे तालिबानला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "पाकिस्तानचा संयम आता पूर्णपणे संपला आहे. सीमेवरील वारंवार होणारे हल्ले आणि आमच्या सैनिकांचे बलिदान आता सहन केले जाणार नाही. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये उघड युद्ध सुरू झाले आहे."