Family Escaped North Korea: जिथे भिंतींनाही कान असतात, जिथे शेजारीच शेजाऱ्याचा शत्रू असतो आणि जिथे सरकारविरुद्ध काढलेला एक शब्दही तुमचा काळ ठरू शकतो, अशा उत्तर कोरियातून एका कुटुंबाने जे धाडस केलं, त्याची कल्पना करणंही कठीण आहे. भुयार खोदून, सुरूंग पेरलेल्या सीमा ओलांडून नव्हे तर चक्क महासागरातून या कुटुंबाने हुकूमशाहीच्या देशातून आपली सुटका करून घेतली. किम कुटुंबाच्या आठ सदस्यांनी केलेल्या या थरारक सुटकेची गोष्ट सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
१० वर्षांची तपश्चर्या आणि एका बापाचे स्वप्न
ही सुटका केवळ दोन तासांच्या प्रवासाची नव्हती, तर त्यामागे १० वर्षांचे सूक्ष्म नियोजन होते. या मोहिमेची सुरुवात झाली किम कुटुंबाच्या प्रमुखापासून. उत्तर कोरियात राहून आता काहीही सुधारणार नाही आणि आपल्या पुढच्या पिढीला देण्यासारखे इथे कोणतेही भविष्य उरलेले नाही, याची जाणीव त्यांना झाली होती. जगाकडे पाहायचे असेल, तर समुद्र हाच आपला एकमेव मार्ग आहे, हा मंत्र त्यांनी आपल्या मुलांना दिला. महत्त्वाचे म्हणजे, या कुटुंबाला समुद्राची कोणतीही माहिती होती. पण तिथून सुटण्यासाठी त्यांनी याच मार्गाची निवड केली.
मासेमारीच्या नावाखाली 'एस्केप प्लॅन'
या कुटुंबातील धाकटा मुलगा, किम इल-ह्योक याला या मोहिमेसाठी तयार करण्यात आले. त्याने किनारपट्टीवर जाऊन आपले आयुष्य सुरू केले. अनेक वर्षे तो मासेमारी शिकला, बोटी दुरुस्त करायला शिकला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर कोरियाच्या सागरी सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवून कसं राहायचं, हे त्याने शिकून घेतले होते.
तिथे किमने आपली प्रतिमा एक निष्ठावान नागरिक आणि सामान्य मच्छिमार म्हणून तयार केली. मासेमारी करतानाच त्याने गुप्तपणे सागरी गस्तीचा वेळ, ठिकाण आणि सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी यांचा नीट अभ्यास केला. अनेकदा त्याला सुरक्षा रक्षकांनी पकडले, पण तिथे चालणाऱ्या लाचखोरीच्या जोरावर त्याने स्वतःला सोडवले.
गुपचूप पाहिलेली दक्षिण कोरियाची स्वप्ने
किम कुटुंबाची आर्थिक स्थिती इतरांच्या तुलनेत चांगली होती. त्यांच्याकडे सरकारने मान्यता दिलेला टीव्ही होता, पण त्यांनी चीनमधून चोरून आणलेला एक छोटा टीव्ही घरात लपवला होता. या टीव्हीवर ते दक्षिण कोरियातील कार्यक्रम पाहत असत. तिथले स्वातंत्र्य, तिथली प्रगती पाहून त्यांच्या मनात देश सोडून जाण्याची तीव्र इच्छा झाली.
पावसाळी रात्र आणि सुटकेचा प्रवास
मे २०२३ मध्ये किम इल-ह्योकची पत्नी गरोदर असतानाच त्यांनी हा धोका पत्करण्याचे ठरवले. एका रात्री प्रचंड पाऊस पडत असताना रडारवरची दृश्यमानता कमी असते, तेव्हाच त्यांनी तिथून पळण्याचा निर्णय घेतला. सुरक्षा रक्षकांना लाच देऊन ते मासेमारीच्या बहाण्याने समुद्रात शिरले.
घरातील महिलांना गुप्तपणे एका ठिकाणी बोलावून बोटीत चढवण्यात आले. ४ आणि ६ वर्षांच्या लहान मुलांना बोटीत लपवताना त्यांनी आवाज करू नये म्हणून गोणीत ठेवण्यात आले होते. इंजिनच्या आवाजापेक्षाही स्वत:च्या हृदयाचे ठोके जास्त ऐकू येत होते, अशा स्थितीत त्यांनी दोन तास प्रवास केला. उत्तर कोरियाच्या सीमेवरून परत येण्याचा कोणताही मार्ग नव्हता. पकडले गेले असते तर मृत्यू किंवा जन्मभर तुरुंगवास निश्चित होता.
अखेर त्यांनी नॉदर्न लिमिट लाईन ओलांडली आणि त्यांना समोर दक्षिण कोरियाचे येओनप्योंग बेट दिसले. किमने सर्चलाईट लावून संकेत दिला आणि काहीच वेळात दक्षिण कोरियाच्या नौदलाची बोट त्यांच्या जवळ पोहोचली. आम्ही उत्तर कोरियातून आलो आहोत, हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते.
उत्तर कोरियातून पळून येणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली असताना, किम कुटुंबाने केलेले हे धाडस इतिहासात नोंदवले गेले आहे. या कुटुंबाने देशातून पळ काढण्यासाठी रचलेला हा १० वर्षांचा प्लॅन कोणत्याही थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही.
Web Summary : A North Korean family of eight, including a pregnant woman, escaped to South Korea after a decade of meticulous planning. They navigated the sea, bribed guards, and risked their lives for freedom, highlighting the desperation and dangers of life under the Kim regime.
Web Summary : एक उत्तर कोरियाई परिवार, जिसमें गर्भवती महिला सहित आठ सदस्य थे, एक दशक की योजना के बाद दक्षिण कोरिया भाग गया। उन्होंने समुद्र में यात्रा की, गार्डों को रिश्वत दी, और स्वतंत्रता के लिए अपनी जान जोखिम में डाली, जो किम शासन के तहत जीवन की निराशा और खतरों को उजागर करता है।