ईदच्या सुट्ट्यांचा आनंद साजरा करून घराकडे परतणाऱ्या प्रवाशांवर काळाने भीषण घाला घातला आहे. बांगलादेशातील राजबाडी जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेली बस थेट पद्मा नदीत कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ही बस ढाक्याच्या दिशेने परतत असताना दौलतदिया टर्मिनलवर ही दुर्घटना घडली.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ५:१५ च्या सुमारास प्रवाशांनी भरलेली ही बस दौलतदिया टर्मिनलवरून एका फेरीवर चढत होती. प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच वेळी एक छोटी युटिलिटी फेरी पोंटूनला येऊन जोरात धडकली. या धक्क्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस क्षणार्धात अनियंत्रित होऊन खोल पद्मा नदीच्या पात्रात कोसळली.
बचावकार्य सुरू पण...
अपघातावेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. बस पाण्यात पडताच सगळेच जोरजोरात ओरडू लागले. काही प्रवाशांनी खिडकीतून बाहेर उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला, मात्र दुर्दैवाने बहुतांश प्रवासी बसच्या आतच अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच लष्कर, पोलीस, अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. खराब हवामान आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते, मात्र सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्यात आली.
एकाच कुटुंबातील अनेकांचा मृत्यू
जेव्हा बस बाहेर काढली गेली, तेव्हा त्यातील दृश्य पाहून बचाव पथकाच्याही डोळ्यात पाणी आले. बसमध्ये १४ मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळले, तर दोन महिलांचे मृतदेह बचाव पथकाला आधीच मिळाले होते. अनेक प्रवासी एकाच कुटुंबातील असल्याने या अपघाताचे स्वरूप अतिशय विदारक होते. अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
पंतप्रधानांनी दिले चौकशीचे आदेश
या भीषण अपघातावर बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेतला असून, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही सरकारकडून देण्यात आले आहे.
Web Summary : A bus carrying passengers returning home after Eid celebrations plunged into the Padma River in Bangladesh, killing 16. The bus lost control while boarding a ferry. Rescue operations faced challenges, revealing a devastating scene with many from one family among the dead. An investigation has been ordered.
Web Summary : बांग्लादेश में ईद मनाकर लौट रहे यात्रियों से भरी बस पद्मा नदी में गिर गई, जिसमें 16 लोगों की मौत हो गई। बस फेरी पर चढ़ते समय नियंत्रण खो बैठी। बचाव कार्य में बाधा आई, एक ही परिवार के कई सदस्यों की मौत हो गई। जांच के आदेश दिए गए हैं।