सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 09:44 IST2025-11-28T09:42:57+5:302025-11-28T09:44:03+5:30
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बोल्सोनारो यांना नजरबंदीत ठेवण्याचा आदेश दिला होता.

सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही. प्रत्येकाला सत्ता हवी असते आणि एकदा का सत्ता मिळाली की ती सहजासहजी कोणालाच सोडायची नसते. ब्राझीलचे ७० वर्षीय माजी राष्ट्रपती जायेर बोल्सोनारो यांचं नाव सध्या यासंदर्भात प्रचंड गाजतं आहे. बाझीलच्या सर्वोच्च न्यायालयानं त्यांना तब्बल २७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
का? नेमकं काय केलं होतं बोल्सोनारो यांनी? त्यांना का एवढ्या मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागतंय? - आपली सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी अत्यंत कुटील कारस्थानं केली आणि एखाद्या गुंडाप्रमाणे आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, खून आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांच्यावर आरोप आहेत.
२०२२ च्या राष्ट्रपती निवडणुकीत बोल्सोनारो यांचा पराभव झाला. मात्र, त्यानंतरसुद्धा त्यांना सत्ता सोडायची नव्हती. त्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी खटपटी लटपटी केल्या. विद्यमान राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांचं सरकार उलथून पाडण्याचा कट रचला. ब्राझीलच्या सरकारी वकिलांचा आरोप आहे की, बोल्सोनारो यांनी निवडणूक हरल्यानंतर सत्ता वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टावर हल्ल्याचा कट रचला. राष्ट्रपती लुला डी सिल्वा आणि न्यायाधीश मोराएस यांच्या हत्येची योजना आखली. सैन्याच्या मदतीनं निवडणूक निकाल बदलण्याचा प्रयत्न केला !
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बोल्सोनारो यांना नजरबंदीत ठेवण्याचा आदेश दिला होता. पण नजरबंदीतही ते स्वस्थ बसले नाहीत. हाऊस अरेस्टमध्ये असतानाही आपल्या तीन खासदार मुलांच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक संदेश पाठवले. रिओ डी जेनेरियोमधील त्यांच्या समर्थकांच्या रॅलीला मुलाच्या फोनवरून त्यांनी संबोधित केलं. सर्वोच्च न्यायालयानं बोल्सोनारो यांना यावरून फटकारलं आणि त्यांना इलेक्ट्रॉनिक अँकल मॉनिटर लावण्याचा तसंच घरातील सर्व मोबाइल जप्त करण्याचा आदेश दिला होता.
एवढं झाल्यानंतर तरी बोल्सोनारो यांनी गप्प बसावं ना! पण त्यांनी त्या मॉनिटरमध्येही छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. इलेक्ट्रॉनिक अँकल मॉनिटर म्हणजे पायाच्या टाचेजवळ घड्याळासारखं किंवा ब्रेसलेटसारखं लावलं जाणारं एक इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग उपकरण आहे. ज्या व्यक्तीला हे उपकरण बसवलं जातं, ती व्यक्ती कुठे आहे, कुठे-कुठे गेली हे ते सतत ट्रॅक करतं. जीपीएस किंवा रेडिओ सिग्नलच्या मदतीनं ही माहिती न्यायालय/पोलिसांकडे पोहोचवली जाते. एखाद्या व्यक्तीला तुरुंगात न ठेवता घरगुती नजरकैद किंवा तपासादरम्यान नियंत्रित स्वातंत्र्य देण्यासाठी हे उपकरण वापरलं जातं. पण, बोल्सोनारो यांनी हे उपकरणही सोल्डरिंग आयर्ननं जाळण्याचा प्रयत्न केला! बोल्सोनारो यांनी ते नाकारण्याचा प्रयत्न केल्यावर न्यायालयानं बोल्सोनारो मॉनिटर जाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा व्हिडीओच जारी केला! बोल्सोनारो पळून जाण्याची शक्यता असल्यानं त्यांना ब्राझीलिया येथील फेडरल पोलिस हेडक्वार्टरमध्येच निगराणीखाली ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. ट्रम्प यांनी याही प्रकरणात उडी घेतली आहे. न्यायालयाचा निर्णय ‘विच हंट’ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बोल्सोनारो हे ट्रम्प यांचे जवळचे मित्र मानले जातात.