पाकिस्तानी संघाला चक्क भांडी घासावी लागली; ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुरवस्थेवर हॉकी कर्णधार शकील अहमद बटचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:34 IST2026-02-18T13:32:41+5:302026-02-18T13:34:15+5:30
Pakistan Exposed: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकिस्तान हॉकी संघाचे प्रचंड हाल. १३ तास विमानतळावर ताटकळले, स्वतःची भांडी स्वतः घासली. कर्णधार शकील अहमद बटचा खळबळजनक खुलासा.

पाकिस्तानी संघाला चक्क भांडी घासावी लागली; ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुरवस्थेवर हॉकी कर्णधार शकील अहमद बटचा संताप
एकेकाळी जागतिक हॉकीवर राज्य करणाऱ्या पाकिस्तानहॉकी संघाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान हॉकी संघाला तेथे जे हाल सहन करावे लागले, त्यावरून कर्णधार शकील अहमद बट याने पाकिस्तान हॉकी फेडरेशनवर जोरदार हल्ला चढवला आहे. "आम्हाला स्वतःची भांडी स्वतः घासावी लागली आणि १३ तास विमानतळावर ताटकळत राहावे लागले," असा खळबळजनक खुलासा कर्णधाराने केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यात खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सिडनी विमानतळावर पोहोचल्यावर संघाला नेण्यासाठी कोणीही नव्हते. समन्वय नसल्यामुळे खेळाडूंना तब्बल १३ तास तिथेच थांबावे लागले. राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी खेळाडूंना स्वतःची भांडी स्वतःच घासावी लागली, असे बटने सांगितले. एका आंतरराष्ट्रीय संघासाठी ही अत्यंत लाजीरवाणी बाब मानली जात आहे.
१० दिवसांचे बुकिंग, १३ दिवसांचा दौरा
फेडरेशनने केवळ १० दिवसांसाठी 'Airbnb' बुकिंग केले होते, तर दौरा १३ दिवसांचा होता. शेवटच्या ३ दिवसांत खेळाडूंना स्वस्त आणि गैरसोयीच्या ठिकाणी राहावे लागले.
कोट्यवधींच्या निधीचे काय झाले?
या वादात आता पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्डाने उडी घेतली असून त्यांनी स्पष्ट केले की, हॉटेलच्या व्यवस्थेसाठी फेडरेशनला १ कोटी पाकिस्तानी रुपये (१० मिलियन) देण्यात आले होते. मग हा पैसा गेला कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंतप्रधानांकडून चौकशीचे आदेश
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. कर्णधार बट याने असाही आरोप केला की, खेळाडूंना प्रसारमाध्यमांशी बोलण्यापासून रोखण्यात आले होते आणि कारवाईची धमकी देण्यात आली होती.