इसापूर धरणाच्या १३ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरु; पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 11:54 IST2025-08-17T11:53:06+5:302025-08-17T11:54:01+5:30
सध्या पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

इसापूर धरणाच्या १३ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरु; पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
इलीयास शेख, कळमनुरी ( जि. हिंगोली): तालुक्याजवळील इसापूर धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये ७ दरवाजे दीड मीटरने आणि ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. धरणातून सध्या ५४,४६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे कळमनुरी ते शेंबाळ पिंपरी या विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्यावर वाहतूक १६ ऑगस्टपासून बंद आहे.
मागील तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. सध्या धरणात ९५.४६ टक्के जलसाठा आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेता १६ ते ३१ ऑगस्ट या काळात धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.
गावागावांततून पाण्याची आवक सुरू आहे...
पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, कन्हेरगाव, अनसिंग, सिरसम, खंडाळा आणि इसापूर या पाणलोट क्षेत्रांतून पाण्याची आवक सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. दरम्यान, इसापूर धरण पूर नियंत्रण कक्षाने नदीकाठच्या आणि पुराचा धोका असलेल्या गावांतील नागरिकांना सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पशुधनाला नदी काठावर येऊ नये...
पैनगंगा नदी पात्रात विसर्ग सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधनाला पैनगंगा काठावर घेऊन जाऊ नये. पशुधनाची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.