दोघी बहिणी, दोघी कमाल! नऊवारी साडीत अनवाणी धाव, भाजीविक्रेत्या आजींनी मॅरेथॉन गाजवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:56 IST2026-01-12T15:53:27+5:302026-01-12T15:56:41+5:30
वसमतच्या दोन भाजी विक्रेत्या बहिणींची मॅरेथॉनमध्ये ऐतिहासिक धाव; अनवाणी पायांनी जिंकली मने

दोघी बहिणी, दोघी कमाल! नऊवारी साडीत अनवाणी धाव, भाजीविक्रेत्या आजींनी मॅरेथॉन गाजवलं!
- इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली): 'वय हे केवळ एक आकडा आहे आणि जिद्द असेल तर परिस्थितीवरही मात करता येते,' हे वसमतमधील दोन सख्या बहिणींनी रविवारी (११ जानेवारी) प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले. घरचा गाडा ओढण्यासाठी रोज भाजीपाला विक्री करणाऱ्या पार्वतीबाई बुरकुले (६०) आणि पुण्यारत्नाबाई मोदे (६५) या दोन बहिणींनी शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या दोघींनीही बक्षीस पटकावून शहराचा गौरव वाढवला आहे.
एक अनवाणी धावली, तर दुसरी फाटक्या बुटांत!
राजू नवघरे सेवा प्रतिष्ठान आणि बाभुळगाव सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत राज्यभरातून नामांकित धावपटू आले होते. मात्र, या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या त्या तथागतनगरमधील या दोन भगिनी. ६० वर्षीय पार्वतीबाई चक्क अनवाणी पायाने ३ किमी धावत होत्या, तर ६५ वर्षीय पुण्यारत्नाबाई यांनी चक्क फाटके बूट घालून ही शर्यत पूर्ण केली. अंगावर साधी नऊवारी साडी आणि पायात कोणतीही विशेष सोय नसताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आत्मविश्वासाने पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले.
बक्षिसाची कमाई आणि मान्यवरांकडून कौतुक
या चुरशीच्या शर्यतीत पार्वतीबाईंनी पाचवा, तर पुण्यारत्नाबाईंनी नववा क्रमांक पटकावून सर्वांना थक्क केले. त्यांच्या या साहसाचे कौतुक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि आमदार राजू नवघरे यांनी स्वतः सत्कार करून केले. कष्टाची भाकरी खाणाऱ्या या दोन माऊलींच्या जिद्दीला आज संपूर्ण महाराष्ट्र सलाम करत आहे. "इच्छा तिथे मार्ग" या म्हणीची जिवंत प्रचिती या दोन्ही भगिनींनी आज समाजाला दिली आहे.