काळ्या मातीची पिवळी माया! हिंगोली बनली देशाची 'हळद राजधानी', १ हजार कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:25 IST2026-01-05T17:20:18+5:302026-01-05T17:25:02+5:30
देशातील १५ टक्के हळद आता एकट्या हिंगोलीत; दरवर्षी १५०० मे. टन हळदीची निर्यात, शेतकऱ्यांच्या घरात समृद्धीची नांदी

काळ्या मातीची पिवळी माया! हिंगोली बनली देशाची 'हळद राजधानी', १ हजार कोटींची उलाढाल
हिंगोली : मागील काही वर्षांत जिल्ह्यातील हळदीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, देशातील सर्वाधिक हळद उत्पादक जिल्हा म्हणून हिंगोली पुढे येत आहे. परिणामी देशभरात हिंगोलीतून हळदीची निर्यात होत आहे.
हळदीच्या उत्पादनासाठी हिंगोली जिल्हा आता देशात नावारूपाला येत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात हळद उत्पादन होत असल्याने ऑक्टोबर २०२२ मध्ये जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली. दरवर्षी जिल्ह्यातून १५०० मे. टन हळदीची निर्यात होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना १ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. हिंगोली जिल्हा हा सर्वांत मोठा हळद उत्पादक प्रदेश बनला आहे.
जिल्ह्यात वसमतसह सर्वच तालुक्यांमध्ये हळदीचे उत्पादन घेतले जात असून, हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून हळदीच्या वाणांवर संशोधन केले जात आहे. प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील हळद उत्पादनात वाढ होत आहे.
वसमतची हळद देशभरात प्रसिद्ध
जिल्ह्यातील वसमत येथे हळद संशोधन केंद्र कार्यान्वित झाले असून, वसमतची हळद म्हणून येथील हळदीला देशभरात मागणी वाढली आहे. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राने वसमत हळदीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार वसमत हळदीला ३० मार्च २०२४ रोजी जीआय टॅग देण्यात आला आहे. सांगली येथील हळदीनंतर हा दर्जा मिळविणारी ‘वसमत हळद’ ही महाराष्ट्रातील तिसरी जात ठरली आहे.
३६ प्रकारच्या वाणांची लागवड
जिल्ह्यात हळदीच्या विविध वाणांची लागवड केली जातेय. त्यामध्ये सेलम, प्रतिभा आणि फुले या वाणांच्या हळदीला मोठी मागणी आहे. हळद उत्पादनातून जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत मोठी भर पडली आहे.
सर्वांत मोठा निर्यातदार
जिल्ह्यात हळदीचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथील हळदीला देशभरातून मागणी वाढत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हा हा हळदीची राजधानी म्हणून समोर येत आहे. देशातील हळदीच्या लागवडीखालील क्षेत्राच्या १५ टक्के क्षेत्र हिंगोली जिल्ह्यातील आहे. हिंगोलीतील हळदीच्या वाणांचा अधिकाधिक प्रचार, प्रसार जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे.
- राहुल गुप्ता, जिल्हाधिकारी, हिंगोली
.........