लेखीसाठी एक फिजिकलसाठी दुसराच; फिंगरप्रिंट न जुळल्याने उघड झाला CISF भरती घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:06 PM2022-08-19T12:06:28+5:302022-08-19T12:07:05+5:30

केंद्रीय सुरक्षा बलाच्या भरतीसाठी तोतया परीक्षार्थी बसवणाऱ्या टोळीचे हिंगोली कनेक्शन उघड;मुंबई पोलिसांनी वारंगा फाटा येथून एकास केली अटक

One for written exam another for physical; Fingerprint mismatch exposes CISF recruitment scam | लेखीसाठी एक फिजिकलसाठी दुसराच; फिंगरप्रिंट न जुळल्याने उघड झाला CISF भरती घोटाळा

लेखीसाठी एक फिजिकलसाठी दुसराच; फिंगरप्रिंट न जुळल्याने उघड झाला CISF भरती घोटाळा

googlenewsNext

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात नोकरी मिळवून देण्यासाठी मोठे रॅकेट कार्यरत आहे. उमेदवाराच्या नावे बनावट परीक्षार्थी लेखी परीक्षा देतोय तर ग्राउंडमध्ये तिसराच उमेदवार उभा राहतोय. या प्रकरणाचे पाळेमुळे मुंबई पोलीस शोधत असून टोळीचे कनेक्शन हिंगोली जिल्ह्यातील तोंडापूरपर्यंत पोहोचले आहे. तोंडापूर येथील एकास मुंबई पोलिसांनी वारंगाफाटा येथून अटक केली.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. यासाठी मुंबई येथील चेंबूर परिसरातील केंद्रावर लेखी परीक्षा पार पडली. ऑगस्ट २०२१ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना मध्य प्रदेशातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, आरटीसी कार्यालय (जि. खरगोन) येथे शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यामध्ये एका विद्यार्थ्यांने शारीरिक क्षमता चाचणीत गुणांकन मिळवले. परंतु त्याचे बोटाचे ठसे जुळत नसल्याचे लक्षात आले. याबाबत तपासणी केली असता लेखी परीक्षेत दिलेले बोटाचे ठसे व फिजिकलसाठी मैदानात आलेल्या उमेदवाराच्या बोटाचे ठसे वेगवेगळे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून संदीप रतनसिंग मान या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षकाने सदर प्रकरणी चौकशी करून मध्य प्रदेशातील बडवाल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तो आरसीएफ पोलीस ठाणे, चेंबूर या ठिकाणी वर्ग करण्यात आला. यात गोविंद बाबूराव शिरडे (रा. जांभूळ सावली, ता. हदगाव, जि. नांदेड) यास रंगेहाथ पकडून त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट उमेदवार म्हणून सदर आरोपीने भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. त्याला आरसीएफ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलीस कोठडीत त्याने सगळा प्रकार सांगितला.

सुरक्षा बलात भरती प्रक्रियेसाठी बनावट परीक्षार्थी परीक्षेत बसवून अनेक उमेदवारांकडून पैसे घेऊन भरती करण्याचा गोरख धंदा सुरू असल्याचे लक्षात आले. या टोळीचे नांदेड कनेक्शन लक्षात घेतल्यानंतर आरोपी गोविंद शिरडे याने लेखी परीक्षेसाठी हिंगोली जिल्ह्यातील तोंडापूर येथील एक जण असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुंबई येथील आरसीएफ पोलीस ठाणे, चेंबूरचे पोलीस उपनिरीक्षक आर. एन. बाबानगरे, पोलीस नायक पाटील, मोकल यांचे पथक १८ ऑगस्ट २०२२ रोजी वारंगा फाटा येथे सकाळी दाखल झाले.

केंद्रीय सुरक्षा बलाची भरती
वारंगा फाटा येथील एका झेरॉक्स दुकानामधून आरोपी गंगाधर संभाजी आम्ले (रा. तोंडापूर ) व त्याचा पार्टनर अशा दोघांना अटक केली. तोतया परीक्षार्थी तयार करून भरती प्रक्रियेत गोरखधंदा करणाऱ्या टोळीचे हिंगोली कनेक्शन उघड झाले आहे. चेंबूर पोलिसांनी सदर आरोपीस अटक करून चौकशी केली. पार्टनरचा सदर गुन्ह्याशी काहीही संबंध नसल्याचे लक्षात आल्याने त्यास सोडून दिले. तर एका आरोपीस घेऊन पुढील तपासासाठी मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली आहे.

भरतीसाठी पाच लाख घेतले...
केंद्रीय बलात भरती करण्यासाठी उमेदवाराकडून पाच लाख रुपये घेतले असल्याचे आरोपीने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पाच लाखात सीआयएसएफमध्ये ट्रेडमॅन म्हणून भरती करण्यात येत होते. यामध्ये औरंगाबाद येथील मुख्य सूत्रधार असून त्याचे मुंबई कनेक्शन असल्याचेही सांगण्यात येते.

तोंडापूर येथील आरोपी उच्चशिक्षित...
तोंडापूर येथील आरोपी बी. एस. डब्ल्यू. अर्थात सामाजकार्य या विषयात पदवी मिळवलेला आहे. सध्या तो वारंगा फाटा येथे ऑनलाइन सर्विसेस व झेरॉक्स सेंटरचे दुकान थाटून व्यवसाय करत आहे. लेखी परीक्षेत सहभागी असल्यानेच त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: One for written exam another for physical; Fingerprint mismatch exposes CISF recruitment scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.