दोन दिवसांत बसस्थानकात निघाले नऊ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:06+5:302021-04-02T04:31:06+5:30

हिंगोली: गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने बसस्थानकात अँटिजेन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे ...

Nine positives left the bus station in two days | दोन दिवसांत बसस्थानकात निघाले नऊ पॉझिटिव्ह

दोन दिवसांत बसस्थानकात निघाले नऊ पॉझिटिव्ह

हिंगोली: गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने बसस्थानकात अँटिजेन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे अँटिजेन तपासणी करण्यात येत आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने दोन महिन्यांमध्ये दोन वेळा टाळेबंदी करण्यात आली. १ ते ७ व २९ मार्च ते ४ एप्रिल अशा दोन्ही टाळेबंदीला हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही आगारांतील बसेस बंद करण्यात आल्या आहेत. अशावेळी परजिल्ह्यांतून येणाऱ्या बसेस मात्र सुरू आहेत.

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना चालक-वाहकांना विनंती करून काही प्रवासी बसथांब्यावरच उतरत आहेत. खरे पाहिले तर जिल्ह्यातील तिन्ही आगारांनी बसथांब्यावर एस. टी. बसेस थांबवू न देता आगारात आणायला पाहिजेत; परंतु तसे होताना दिसत नाही. हिंगोली बसस्थानकात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळातच अँटिजेन तपासणी केली जात आहे. नंतर मात्र तपासणी होत नाही. अशावेळेस परजिल्ह्यांतून आलेले प्रवासी अँटिजेन तपासणी न करताच घरी जात आहेत. ३१ मार्च रोजी बसस्थानकात ४० प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोनजण कोरोनाबाधित आढळून आले.

१ एप्रिल रोजी ९५ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यावेळी सातजण कोरोनाबाधित आढळून आले. आगारातून बसेस सोडणे बंद केेले असल्यामुळे प्रवासी कमीच आहेत. अँटिजेन तपासणीसाठी डॉ. नावीद, स्वाती कांबळे, प्रवीण भालेराव, अश्विनी काशिदे, सुधा सपकाळ, न. प. कर्मचारी जाधव, आशीष देशमुख, मुकेश ठोंबरे, डॉ. कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टाळेबंदीमुळे आगारातून बसेस सोडण्यात येत नसल्या तरी परजिल्ह्यांतून बसेस मात्र सुरू आहेत. गुरुवारी अकोला येथून ३, आर्वी येथून १, पुसद येथून ५, वाशिम येथून ३, शेगाव येथून १, रिसोड येथून १५ बसेस स्थानकातून येऊन गेल्याची माहिती कंट्रोलर एन. जी. मानकर यांनी दिली.

अँटिजेन तपासणीसाठी एस. टी. कर्मचारी

२९ मार्चपासून जिल्हा प्रशासनाने टाळे बंदी लागू केली आहे. त्यामुळे आगारातून जाणाऱ्या बसेस बंद आहेत. चालक व वाहकांना त्यामुळे काम शिल्लक राहिले नाही. अशावेळी आगारप्रमुखांनी निर्णय घेऊन दोन एस. टी. कर्मचाऱ्यांची अँटिजेन तपासणीसाठी कामासाठी मदतनीस म्हणून नियुक्ती केली आहे.

Web Title: Nine positives left the bus station in two days