पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर 'वर्गोन्नत' उल्लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:31 AM2021-05-06T04:31:56+5:302021-05-06T04:31:56+5:30

हिंगोली : कोरोनामुळे पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित मूल्यमापन करणे शक्य झाले ...

Mention of 'Vargonnat' on the progress sheets of students from 1st to 4th | पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर 'वर्गोन्नत' उल्लेख

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकावर 'वर्गोन्नत' उल्लेख

Next

हिंगोली : कोरोनामुळे पहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित मूल्यमापन करणे शक्य झाले नाही. अशा विद्यार्थ्यांना बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार पुढील वर्गात ‘वर्गोन्नत’ करण्यात आले आहे. त्यांच्या प्रगतिपत्रकावरही ‘वर्गोन्नत’ असल्याचा उल्लेख करण्यात येत आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करता आल्या नाहीत. इयत्ता १ ली ते ४ थीच्या वर्गांना प्रत्यक्ष वर्गात अध्यापन करणे शक्य झाले नसले तरी दीक्षा ॲप, शाळा बंद ...पण शिक्षण आहे, टिलीमिली, ज्ञानगंगा आदींच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा शासन व शाळांनी प्रयत्न केला; परंतु, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांचे केवळ अकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली, अशा विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्यांचे रूपांतर १०० गुणांमध्ये करावे, त्यानंतर त्यांची श्रेणी निर्धारित करावी, तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित मूल्यमापन करणे शक्य झाले नाही, अशा विद्यार्थ्यांना आरटीई २००९ अंतर्गंत च्या कलम १६ नुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा न देताच उतीर्ण करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या प्रगतिपत्रकावर आरटीई ॲक्ट २००९ नुसार ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख येत आहे.

प्रगतिपत्रकच बदलणार

इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गंत पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात आले आहे. त्यामुळे प्रगतिपत्रकावरही विषयांसमोर आरटीई ॲक्ट २००९ नुसार ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख करण्यात येत आहे. त्यावर विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, तुकडी, रजि. नं. जन्मदिनांकांचा उल्लेख असणार आहे.

मुले घरात कंटाळली

मागील वर्षभरापासून शाळा सुरू झाली नाही. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी घराबाहेर पडता आले नाही. शाळा सुरू असत्या तर विविध स्पर्धेत सहभागी होता आले असते. आता शाळा लवकर सुरू व्हाव्यात.

- अश्विनी रामदास खराटे, कौठा

शाळा बंद असल्या तरी पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे. परंतु, शाळा सुरू असत्या तर मित्रांबरोबर खेळता आले असते. घरात सारखं राहून कंटाळा आला आहे. शाळा लवकर सुरू कराव्यात.

- धीरज ज्ञानेश्वर हमाने, कडोळी

परीक्षा न देताच पास झाले आहे. मात्र, घरात राहून कंटाळा आला आहे. शाळा सुरू झाल्यास वर्गात बसून शिक्षण घेता येईल तसेच विविध स्पर्धेत सहभागी होता येईल.

-अमृता शिवप्रसाद मुलगीर, पोत्रा

शैक्षणिक नुकसान भरून काढणार

कोरोनामुळे शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याकरिता २०२१-२२ मध्ये शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने कृती कार्यक्रम विकसित करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पहिलीतील विद्यार्थी - २२८५२

दुसरीतील विद्यार्थी - २३१८७

तिसरीतील विद्यार्थी - २२११२

चौथीतील विद्यार्थी - २१८७४

Web Title: Mention of 'Vargonnat' on the progress sheets of students from 1st to 4th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.