Hingoli: टेम्पोचा टायर फुटला अन् मृत्यूच्या दारातून परतले गोवंश; तस्करांचा निर्दयीपणा उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:33 IST2025-12-26T18:32:46+5:302025-12-26T18:33:23+5:30
टेम्पोचा टायर फुटल्याने उघड झाली जनावरांची क्रूर वाहतूक; 'टोल'च्या गाडीला पोलीस समजून तस्कर पसार

Hingoli: टेम्पोचा टायर फुटला अन् मृत्यूच्या दारातून परतले गोवंश; तस्करांचा निर्दयीपणा उघड
आखाडा बाळापूर: नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर कुर्तडी फाट्याजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका भीषण अपघाताने जनावरांच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे. कत्तलीसाठी अत्यंत निर्दयीपणे कोंबून नेली जाणारी जनावरे घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने हा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, पोलिसांच्या धाकाने तस्कर आपली आलिशान कार आणि अपघातग्रस्त वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत शेतात पळून गेले.
मुक्या जिवांची छळवणूक मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास एक पिकअप वाहन पाच गाई आणि एका गोऱ्याला अत्यंत क्रूरपणे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात होते. कुर्तडी पाटीजवळ अचानक या वाहनाचा टायर फुटला आणि वाहन महामार्गावरच उलटले. या वाहनासोबत असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारमधील (MH 12 KL 7933) लोक खाली उतरले आणि उलटलेली गाडी सरळ करून जनावरांना पुन्हा त्यात कोंबण्याचा प्रयत्न करू लागले.
एका चुकीच्या समजुतीने भामटे पळाले!
हा सर्व प्रकार सुरू असतानाच जरोडा टोलनाक्याचे पेट्रोलिंग वाहन तिथून जात होते. या वाहनाच्या पिवळ्या दिव्यांना पोलीस समजून तस्करांची बोबडी वळली. पोलिसांनी आपल्याला घेरले, या भीतीने तस्कर जनावरे, पिकअप टेम्पो आणि आपली महागडी कार जागेवरच सोडून शेतात पळून गेले. काही वेळातच बाळापूरचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
मोठा मुद्देमाल जप्त
बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावरून ५ गाई, १ गोरा, स्विफ्ट डिझायर कार आणि पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जमादार प्रभाकर भोंग यांच्या तक्रारीवरून तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बीट जमादार गौसोद्दीन शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.