हिंगोली हादरलं! शेतातील कामाच्या वादातून भावानेच केली मोठ्या भावाची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:25 IST2026-01-15T19:22:44+5:302026-01-15T19:25:34+5:30
हट्टा पोलिसांकडून २ तासांत खुनाचा उलगडा; आरोपीला बेड्या

हिंगोली हादरलं! शेतातील कामाच्या वादातून भावानेच केली मोठ्या भावाची निर्घृण हत्या
वसमत (हिंगोली): वसमत तालुक्यातील मौजे रांजोणा येथे माणुसकीला आणि रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शेतीतील कामाच्या किरकोळ वादातून एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या २५ वर्षीय सख्ख्या मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याची निर्घृण हत्या केली. नवनाथ नामदेव सावळे असे मयताचे नाव असून, त्याचा धाकटा भाऊ गजानन सावळे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हिंगोली पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या खुनाचा छडा अवघ्या दोन तासांत लागला.
नेमका प्रकार काय?
मिळालेली माहिती अशी की, १५ जानेवारी रोजी पहाटे रांजोणा शिवारातील नामदेव सावळे यांच्या शेत आखाड्यावर नवनाथचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने नवनाथचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि डीवायएसपी राजकुमार केंद्रे यांच्यासह मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
पोलिसांची चाणाक्ष नजर अन् आरोपीची कबुली
सुरुवातीला हा खून कोणी केला असावा याचा कोणताही सुगावा लागत नव्हता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा केला असता आडोशाला लपवलेली रक्ताने माखलेली कुऱ्हाड सापडली. तपासादरम्यान पोलीस अधिकारी संग्राम जाधव आणि त्यांच्या पथकाला मृताचा धाकटा भाऊ गजानन याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तो पोलिसांसमोर सर्व सामान्य वागण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
शेत कामातून वाद, संतापात खून
शेतातील काम आणि घरगुती वाद आरोपी गजाननने कबुली दिली की, मोठ्या भावाशी त्याचे शेतातील कामावरून आणि इतर घरगुती कारणावरून सतत वाद होत असत. १५ जानेवारीच्या मध्यरात्री संतापाच्या भरात गजाननने झोपेत असलेल्या नवनाथच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या पथकाने बजावली कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, आणि डीवायएसपी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संग्राम जाधव , स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले,सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि माधव जिव्हारे, पोउपनि संजय केंद्रे,हकीम शेख, संदीप सुरुसे, प्रीतम चव्हाण, गणेश सूर्यवंशी यांच्या पथकाने केली. अवघ्या दोन तासांत खुनाचा पर्दाफाश केल्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे. आरोपी गजानन सावळे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास हट्टा पोलीस करत आहेत.