Hingoli: कागदावर अंगठ्याचे ठसे घेत माजी सैनिकाच्या पत्नीचे २० लाख रुपये तरुणाने हडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:44 IST2025-08-22T13:39:31+5:302025-08-22T13:44:15+5:30

फसवणुकीच्या या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hingoli: Former soldier's wife cheated, young man transferred Rs 20 lakh to mutual account | Hingoli: कागदावर अंगठ्याचे ठसे घेत माजी सैनिकाच्या पत्नीचे २० लाख रुपये तरुणाने हडपले

Hingoli: कागदावर अंगठ्याचे ठसे घेत माजी सैनिकाच्या पत्नीचे २० लाख रुपये तरुणाने हडपले

वसमत: 'थकीत पेन्शन मिळवून देतो', असे म्हणत माजी सैनिकाच्या वृद्ध पत्नीच्या बँक खात्यातील २० लाख ४३ हजार ४६५ रुपये परस्पर आपल्या खात्यात वळवून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फसवणुकीच्या या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. 

वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन येथील शांताबाई कुंडलिक कुटे (७८)यांचे पती कुंडलीक कुटे हे सैन्यदलात होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांचे सेवानिवृती वेतनाचे पैसे व इतर रक्कम त्यांना मिळाली होती. त्यानंतर सन २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे सेवानिवृत्ती वेतन शांताबाई यांच्या वसमत येथील भारतीय स्टेट बँकेच्या बँक खात्यात जमा केले जात होते. मात्र, सेवानिवृत्ती वेतनाची थकबाकी मिळण्यासाठी शांताबाई यांनी पाठपुरावा सुरु केला होता. याकाळात त्यांच्या एका नातेवाईकाने शांताबाई यांची ओळख निलेश गांगे (रा. मुकुंदवाडी, छत्रपतीसंभाजीनगर) या तरुणासोबत करून दिली. यावेळी निलेश याने शांताबाई यांना थकीत पेन्शन मिळवून देतो, असे सांगत कागदपत्रे तयार करत त्यांचा विश्वास संपादन केला. 

दरम्यान, शांताबाई यांच्या अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेत काही कागदपत्रावर त्यांचे अंगठ्याचे ठसे घेतले. त्यानंतर त्यांच्या भारतीय स्टेट बँक शाखा वसमत येथील बँकेतून त्यांच्या खात्यात जमा असलेली पेन्शनची २० लाख ४३ हजार ४६५ रुपये आपल्या खात्यात वळवून घेतले. हा प्रकार १६ एप्रिल २०२५ पूर्वी घडला. काही दिवसानंतर शांताबाई यांना खात्यात रक्कम नसल्याचे समजले. बँकेत जाऊन चौकशी केली असता निलेश याने सर्व रक्कम त्याच्या खात्यात वळवून घेतल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी निलेश गांगे याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाध, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या सह कर्मचारी तपास करीत आहेत.

पोलीसांचे पथक रवाना
२० लाख ४३ हजार ४६५ रुपये परस्पर आपल्या खात्यात वळवुन माजी सैनिकाच्या पत्नीची फसवणुक करणाऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक छत्रपती संभाजी नगर येथे रवाना झाले आहे.

Web Title: Hingoli: Former soldier's wife cheated, young man transferred Rs 20 lakh to mutual account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.