शालेय पोषण आहाराचा रिकामा बारदाना शोधताना मुख्याध्यापक घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST2021-04-09T04:31:53+5:302021-04-09T04:31:53+5:30

कळमनुरी तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या व खासगी अनुदानित अशा एकूण २१९ शाळा आहेत. या शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय ...

The headmaster sweats while searching for an empty bag of school nutrition food | शालेय पोषण आहाराचा रिकामा बारदाना शोधताना मुख्याध्यापक घामाघूम

शालेय पोषण आहाराचा रिकामा बारदाना शोधताना मुख्याध्यापक घामाघूम

कळमनुरी तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या व खासगी अनुदानित अशा एकूण २१९ शाळा आहेत. या शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप करण्यात येतो. या वर्षात कोरोना महामारीच्या संकटामुळे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा भरल्याच नाहीत. पाचवी ते आठवीच्या शाळाही काही दिवसच सुरू होत्या. या वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. जुलै महिन्यात ३४ दिवसांचे, त्यानंतर साठ दिवसांचे व पुढे ५६ दिवसांचा पोषण आहार वाटप करण्यात आला. सध्या शालेय पोषण आहार वाटपाच्या यंत्रणेकडून पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे. सध्या तांदूळ, हरभरा व मूग डाळ शाळांना वाटप केले जात आहे. वर्षभरात तांदूळ व धान्यादी माल वाटप करण्यात आला. आता विद्यार्थ्यांना तांदूळ धान्यादी माल वाटप केल्यानंतर रिकामा झालेला बारदाना पुरवठा धारकास परत करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. त्यानुसार तांदूळ, धान्यादी मालाचा रिकामा बारदाना पुरवठा धारकास परत करावा, असे आदेश शालेय पोषण आहाराचे अधीक्षक उमेश राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील सर्व शाळांना दिले आहेत. बारदाना पुरवठा धारकास दिल्यानंतर त्याची पोहोच ठेवावी, बारदाना देताना कोणत्या वाटपाचे बारदाना परत करत आहात हेही पत्रात नमूद करावे, एकूण किती बारदाना परत केला याचा अहवाल केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्याध्यापकांना द्यावयाचा आहे. आता मुख्याध्यापकांना रिकामा बारदाना पुन्हा शोधावा लागणार आहे. हा बारदाना सापडला नसल्यास विकत घेऊन पुरवठा धारकांना परत करावा लागणार आहे. त्यामुळे बारदाना शोधताना मुख्याध्यापकांना चांगलीच डोकेदुखी वाढली असून, उन्हाच्या कडाक्यात मुख्याध्यापक घामाघूम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रतिक्रिया...

विद्यार्थ्यांना तांदूळ धान्यादी माल वाटप केल्यानंतर रिकामा झालेला बारदाना पुरवठा धारकास परत करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. त्यानुसार बारदाना परत करण्यास तालुक्यातील शाळांना सांगितले आहे.

- उमेश राऊत, अधीक्षक, शालेय पोषण आहार

Web Title: The headmaster sweats while searching for an empty bag of school nutrition food