Hingoli: १० हजारांची लाच घेताना पोलिस हवालदारासह, होमगार्डला एसीबीने रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:18 IST2025-06-26T13:17:47+5:302025-06-26T13:18:12+5:30

दोघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ACB catches police constable, home guard red-handed while taking bribe of Rs 10,000 | Hingoli: १० हजारांची लाच घेताना पोलिस हवालदारासह, होमगार्डला एसीबीने रंगेहाथ पकडले

Hingoli: १० हजारांची लाच घेताना पोलिस हवालदारासह, होमगार्डला एसीबीने रंगेहाथ पकडले

हिंगोली : दारुची केस न करण्यासाठी १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलिस हवालदारासह आणि एका व्यक्तीस २५ जून रोजी रंगेहाथ पकडण्यात आले असून, दोघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

प्रवीण गोपालराव राठोड (पोलिस हवालदार, बासंबा पोलिस ठाणे) आणि होमगार्ड दत्ता बळीराम दराडे अशी आरोपींची नावे आहेत. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार वडिलांवर दारुची केस करणार आहे, दारुची केस करायची नसेल व गुन्हा दाखल करायचा नसेल तर १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी पोलिस हवालदार प्रवीण राठोड यांनी केली. ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाल्यानंतर २५ जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तेव्हा प्रवीण राठोड याने तक्रारदारास वाशिम- नांदेड रोडवरील इसापूर पाटी येथे बोलावले. त्यावरुन सापळा लावण्यात आला. त्यावेळी प्रवीण राठोड यांनी लाचेची रक्कम दत्ता दराडे याच्याकडे देण्यास सांगितली. दराडे यांनी १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपींची अंगझडती घेतली तेव्हा प्रवीण राठोड याच्याकडून ८१०० रुपये आणि एक मोबाईल आणि दत्ता दराडे याच्याकडून २१५० रुपये व मोबाईल जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक तथा सापळा अधिकारी विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक युनूस शेख, विजय शुक्ला, भगवान मंडलिक, राजाराम फुपाटे, गजानन पवार, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, योगिता अवचार, वाघ, हवालदार शेख अकबर आदींनी केली.

Web Title: ACB catches police constable, home guard red-handed while taking bribe of Rs 10,000