"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:46 IST2025-09-26T11:45:09+5:302025-09-26T11:46:20+5:30
Santosh bangar wet drought news: शेतकरी, विरोधकांपाठापोठ आता सत्ताधारी पक्षातूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ही मागणी केली आहे.

"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
Maharashtra Wet Drought News: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे. पिके सडली आहेत. काही ठिकणी पिकासह जमिनी वाहून गेल्या आहेत. तर काही ठिकाणी चार दिवस झाले तरी पाणी अजूनही पूर्णपणे ओसरलेलं नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फटका बसला असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. यावर सरकारकडून बोलणं टाळलं जात असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनीच ही मागणी केली आहे. 'शेतकऱ्यांना ३० टक्के, ४० टक्के, ७० टक्के नव्हे, तर शंभर टक्के मदत भेटली पाहिजे', असे बांगर म्हणाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मागणी केली. शेतकऱ्यांना मदत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासदंर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्याला शंभर टक्के मदत भेटली पाहिजे
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. हा संतोष बांगर सुद्धा शेतकरीच आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की, ३० टक्के, ४० टक्के, ५० टक्के, ६० टक्के,७० टक्के नाही, तर माझ्या शेतकऱ्याला १०० टक्के मदत भेटली पाहिजे", अशी मागणी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केली.
ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, कारण...
"ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, कारण परिस्थिती अशी आहे की, गावागावांमध्ये, शेताशेतांमध्ये आपण जाऊन बघितलं, तर सोयाबीन तर काहीच राहिले नाही. सडून गेलं. या महाराष्ट्राचे शासन, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मंत्र्यांना गावांमध्ये आढावा घेण्यासाठी पाठवले आहे", असे संतोष बांगर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
"नुकसान दोन लाख ९१ हजार हेक्टर झालेले आहे. शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही, असं मला वाटतं. माझी मागणी आहे की, सरकारने अडीच हेक्टर ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मर्यादा करून मदत द्यावी", असे आमदार संतोष बांगर म्हणाले.
सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यावर मौन
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, पालकमंत्री पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी झाली. कर्जमाफी करण्याकडे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधले. पण, आतापर्यंत सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.