मुलींचा 'सायलंट किलर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 09:43 IST2026-01-11T09:42:29+5:302026-01-11T09:43:16+5:30
अॅनिमियाच्या प्रमुख कारणांमध्ये कुपोषण व अनुवांशिक आजार यांचा प्रामुख्याने समावेश होतो

(प्रातिनिधीक छायाचित्र)
डॉ. प्रवीण शिनगारे
माजी वैद्यकीय शिक्षण संचालक
भारताला स्वातंत्र मिळाल्यापासून शासनाला भादेशाच्या प्रगतीसाठी असंख्य पातळीवर लढावे लागले आहे. त्यामध्ये शिक्षण व आरोग्य हे दोन महत्त्वाचे विषय होते. बालमृत्यू त मातामृत्यू यात भारत जगातील अप्रगत देशांपेक्षाही नीचांकी पातळीवर होता. आजही आपण 'शांत आणीबाणीचा रोग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅनिमियाच्या रुग्णांच्या समस्या पूर्णपणे सोडवू शकलेलो नाही. आपण 'कोविड-१९'सारख्या महाभयानक साथीविरुद्ध लढा दिला व देशाला त्या आणीबाणीतून बाहेर काढले. मागील महिन्यात वसई शहरात एका किशोरवयीन मुलीचा शाळेत असताना मृत्यू झाला.
शिक्षकाने उठाबशा काढण्याची शिक्षा त्या मुलीला दिली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आक्षेप पालकांनी घेतला. शाळेचे व शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मुलीचा मृत्यू अॅनिमियामुळे झाला. म्हणूनच अॅनिमियाला गर्भवती माता व मुलींचा मूक हत्यारा (सायलंट किलर) असे म्हणतात. भारत सरकारनेही हे सार्वजनिक आरोग्यावरील 'मूक संकट' असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी १९७० मध्ये केंद्र शासनाने पोषण कार्यक्रम सुरू केला होता. त्यावेळी जेवढ्या लोकसंख्येचे लक्ष्य होते, तेवढेच ते आताही आहे. याचा अर्थ कार्यक्रमाचा लाभ होऊन जितक्या महिला गेल्या तितक्याच संख्येने महिला नवीन रुग्ण म्हणून समाविष्ट झाल्या. तथापि, याला या कार्यक्रमाचे अपयश म्हणता येणार नाही.
नवीन औषध व मर्यादा
अॅनिमियाच्या प्रमुख कारणांमध्ये कुपोषण व अनुवांशिक आजार यांचा प्रामुख्याने समावेश होतो. अनुवांशिकतेमुळे (थलेसेमिया व सिकलसेल) अॅनिमिया आणि माता व बालमृत्यूंचे प्रमाण अदिवासी व अनुसूचित जातीमध्ये मोठे आहे. मागील आठवड्यात एका नवीन औषधाला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. हे औषध (मिटापिन्होट) सध्या भारतात उपलब्ध नाही; पण उपलब्ध झाल्यास अनुवांशिक आजारामुळे होणाऱ्या अॅनिमियाच्या रुग्णांना त्याचा मोठा फायदा होईल. देवी (स्मॉलपॉक्स) सारख्या गंभीर आजारावर आपण मात केली; पण १०० टक्के निर्मूलन सहज करता येणाऱ्या अॅनिमिया रोगावर मात्र आपण मागील ५० वर्षात प्रयत्न करूनही मात करू शकलो नाही. त्याचे एकमेव कारण म्हणजे गर्भवती माता व किशोरवयीन मुलींचे कुपोषण. यावर मिटापिन्होट व अशा प्रकारच्या औषधांचा उपयोग नाही. पुरेसा पोषण आहार हाच यावर एकमेव रामबाण इलाज आहे.
जागतिक भूक निर्देशांक आणि भारताची स्थिती
जागतिक आकडेवारी असे दाखवते की, जगातील १२३ देशांपैकी भारत हा भुकेच्या निर्देशांकामध्ये १०२ व्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील कुपोषण हे सौम्य, मध्यम, माफक किंवा गंभीर पातळीवरील नव्हे, तर अतिशय भयावह (धक्कादायक) पातळीवरचे आहे. यामुळे अॅनिमिया (न्युट्रीशनल) होतो व तेच एक मोठे माता व बालमृत्यूचे कारण आहे.
नोव्हेंबर २०२५ च्या तिसऱ्या आठवड्यात 'लोकमत'ने बातमी दिली होती की, मेळघाटमधील माता-बालमृत्यू रोखण्यास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला सपशेल अपयश आले आहे व त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने शासनाची चांगलीच कानउघाडणी केली. उच्च न्यायालयाने 'या मृत्यूंच्या गंभीर प्रश्नाकडे राज्य शासन केवळ किरकोळ अनौपचारिकतेने (एक्स्ट्रिमली कॅज्युअल अॅप्रोच) पाहत आहे' अशा कठोर शब्दांचा वापर केला आहे.
जपानपाठोपाठ भारताची 'वृद्धांचा देश' अशी ओळख बनण्याच्या मार्गावर आहे. एकूण लोकसंख्येमध्ये कार्यक्षम लोकांची (युथ वर्कफोर्स) संख्या कमी होत गेल्यास आर्थिक प्रगतीला खीळ बसणार आहे. अॅनिमियामुळे होणाऱ्या बालमृत्युंमुळे युवकांची संख्या घटत आहे व जन्मणाऱ्या बालकांमध्ये निरोगी व सक्षम बालकांची संख्याही अॅनिमियामुळे कमी होत आहे.
अॅनिमियामुळे भारताची लोकसंख्या 'बदल पातळी'च्याही खाली म्हणजेच १.९ पर्यंत आली आहे. प्रत्यक्षात 'बदल पातळी' (रिप्लेसमेंट लेव्हल) २.१ हवी. भारताच्या लोकसंख्या स्थैर्याला त्यामुळे नजिकच्या काळात धोका निर्माण झाला आहे. या स्थैर्यतेच्या पातळीसाठी धोकादायक ठरणाऱ्या कारणांपैकी एक असलेल्या व पोषणाने बऱ्या होणाऱ्या अॅनिमियाकडे लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.