कोडावर उपाय : योग्य काळजी घेतल्यास हा त्वचारोग होऊ शकतो पूर्णपणे बरा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:17 IST2025-10-06T12:16:30+5:302025-10-06T12:17:11+5:30
Eczema : त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रचिता धुरत सांगतात की, कोड हा एक त्वचारोग आहे, ज्यामध्ये शरीरावर पांढरे डाग (चट्टे) पडतात.

कोडावर उपाय : योग्य काळजी घेतल्यास हा त्वचारोग होऊ शकतो पूर्णपणे बरा!
Eczema : कोड हा एक स्वयंप्रतिकारक (ऑटोइम्यून) आजार आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून आपल्या स्वतःच्या त्वचेला हानी पोहोचवते. यामध्ये मेलानोसाइट्स नावाच्या पेशींवर हल्ला होतो. या पेशी आपल्या त्वचेला रंग देणाऱ्या रंगद्रव्याचं (मेलॅनिन) उत्पादन करतात.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रचिता धुरत सांगतात की, कोड हा एक त्वचारोग आहे, ज्यामध्ये शरीरावर पांढरे डाग (चट्टे) पडतात. हा आजार फक्त सौंदर्यदृष्टीने त्रासदायक नसून मानसिक तणावाचे कारण ठरतो; पण योग्य माहिती आणि योग्य उपचार घेतल्यास हा आजार नियंत्रणात आणता येतो.
कोणालाही होऊ शकतो का?
होय, कोड हा सर्व वंश, वयोगट आणि त्वचेच्या रंगाच्या लोकांमध्ये होऊ शकतो. मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत कोणालाही कोड होऊ शकतो.
आनुवंशिक आहे का?
कोड काहीवेळा कुटुंबात चालत असतो; पण घरात एखाद्याला कोड आहे म्हणून तुम्हालाही होईल, याची हमी नाही. यामागे अनेक जनुकीय घटक काम करत असतात.
सामान्य गैरसमज
गैरसमज १ : कोड संसर्गजन्य आहे.
खरे : कोड अजिबात संसर्गजन्य नाही. स्पर्श, अन्न किंवा हवेने तो पसरत नाही.
गैरसमज २ : आंबट पदार्थ किंवा मासे खाल्ल्यानंतर दूध पिल्यामुळे कोड होतो.
खरे : आहारामुळे कोड वाढतो किंवा कमी होतो, याचा स्पष्ट वैज्ञानिक पुरावा नाही. उलटपक्षी, लिंबू, आवळ्यासारखे अँटिऑक्सिडंट पदार्थ फायदेशीर असू शकतात.
प्रमुख शस्त्रक्रिया प्रकार
मिनी पंच ग्राफ्टिंग : मांडी किंवा नितंबावरून १-२ मिमी व्यासाचा त्वचेचा छोटा तुकडा घेऊन, कोडच्या पांढऱ्या डागावर बसवला जातो. हा एकदिवसीय, सोपा आणि सुरक्षित उपचार आहे.
सक्शन ब्लिस्टर ग्राफ्टिंग : त्वचेवर सूक्ष्म फोड निर्माण करून, ते वेगळे करून कोडच्या डागावर लावले जातात. काही आठवड्यांत रंगद्रव्य तयार होते.
नॉन-कल्चर्ड मेलानोसाइट ट्रान्सफर : एका लहान त्वचेच्या तुकड्यातून मेलानोसाइट्स वेगळे करून, ते कोड असलेल्या भागावर लावले जातात. ही प्रक्रिया जास्त परिणामकारक मानली जाते.
उपचार कोणते..?
१ टॉपिकल क्रीम : स्टेरॉइड क्रीम्स, गोळ्या, स्टेरॉइड्स, इम्युनो-सप्रेसंट औषधे, प्रकाश उपचार, नॅरोबँड युव्हीबी फोटोथेरपी
२. शस्त्रक्रिया : जेव्हा कोड एक वर्षभर स्थिर राहतो आणि औषधोपचार व प्रकाश उपचार उपयोगी पडत नाहीत, तेव्हा शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.