Mental health is essential for all | अनिवार्य आहे मानसिक आरोग्य
अनिवार्य आहे मानसिक आरोग्य

- डॉ. अनघा पाटील, मानसतज्ज्ञ 

१० ऑक्टोबर हा दिवस संबंध जगभर जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणे आणि मानसिक आजाराशी निगडीत असलेला कलंक दूर करणे हे त्यामागचे उद्देश आहेत. जगभरामध्ये १२ टक्के व्यक्ती मानसिक आजारांनी ग्रासलेल्या आहेत. म्हणजे जवळपास ४५० दशलक्ष किंवा चार व्यक्तीमधील एक व्यक्ती ही व्याधिग्रस्त आहे. या सर्व व्याधी योग्य निदान आणि उपचार याने ब-या होतात. भारतामध्ये आयुष़्यभर मानसिक आजार टिकून राहणा-या व्यक्तींचे प्रमाण १३.७ टक्के आहे. प्रामुख्याने १५० दशलक्ष भारतीय व्यक्तींना उत्तम मानसिक आरोग्य उपचारांची गरज आहे. पण दुर्दैवाने जोपर्यंत आजार तीव्र स्वरूप धारण करीत नाही तोपर्यंत अनेक कुटुंब याकडे दुर्लक्ष करतात.

केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर मानसिक आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि दुसरीकडे त्याबद्दल कमालीचे अज्ञान आणि प्रचंड गैरसमज आहेत. माणसाने पृथ्वीवरून अवकाशात चांद्रयान पाठविण्याइतकी नेत्रदीपक प्रगती केली आहे. पण दुर्दैवाने मानसिक आजारांबाबतचा समाजाचा दृष्टिकोन प्रचंड नकारात्मक, कलुषित, जुनाट, बुरसटलेला आहे. मानसिक आजार लज्जास्पद आणि भीतीदायक मानून ते लपवून ठेवले जातात. दुर्दैवाने सुशिक्षित व्यक्ती देखील मानसिक आजार म्हणजे आपल्यावरील कलंक समजतात. त्यामुळेच जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यामागे मानसिक आरोग्याचे संवर्धन, जतन आणि मानसिक आजारांपासून प्रतिबंधन ही देखील महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. 

मानसिक आरोग्य म्हणजे काय ?
आपली पंचेंद्रिय ही मानवाला मिळालेली सर्वात महत्त्वाची देणगी आहे. या पंचेंद्रियापेक्षा प्रभावी असे इंद्रिय म्हणजे मानवी मन! प्रत्येक क्षणी हे मन आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. इतर इंद्रियांप्रमाणे मन डोळ्याला दिसत नाही. पण ते शरीरापेक्षाही सामथ्र्यशाली आहे. शरीराप्रमाणेच त्याचे आरोग्य बिघडू शकते. मानसिक आरोग्य म्हणजे भावनिक, मानसिक आणि सामाजिक तंदुरुस्ती किंवा स्वस्थता. आपण कसा विचार करतो? आपल्याला काय वाटते? आपण कसे वर्तन करतो? या सर्व गोष्टींवर मानसिक आरोग्याचा परिणाम होतो. याशिवाय आपण जीवनातल्या ताणतणावांना कसे सामोरे जातो? इतर व्यक्तींशी कसे संबंध प्रस्तापित करतो? याच्याशी देखील मानसिक आरोग्याचा जवळचा संबंध असतो. थोडक्यात ज्यामुळे आपल्या मनाचा विकास, ताकद, गुणवत्ता खुंटते, त्याच्यावर परिणाम होतो अशा प्रसंगांपासून मनाला जपण्याची कला अवगत करणे म्हणजे मानसिक आरोग्य.

मानसिक आरोग्याचे अनेक पैलू आहेत. जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना लवचिकता ठेवणे, स्वत:बद्दल समर्थतेची जाणीव बाळगणे, वास्तववादी विचार करता येणे याबरोबरच समस्यांची सोडवणूक करणे, स्वत:ची देखभाल करणे, ताणाचे व्यवस्थापन इत्यादी. दैनंदिन जीवनात आपल्याला कधी ताप, डोकेदुखी, खोकला या किरकोळ आजारांबरोबरच मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब यासारख्या आजारांचाही सामना करावा लागतो. या आजारांबाबत आपल्याला थोडीफार माहितीही असते आणि आपण तत्परतेने डॉक्टरांकडेही जातो. पण दुर्दैवाने आजही मानसिक आजार दुर्लक्षित, उपेक्षित राहतात. त्यानंतर ते गंभीर स्वरूप धारण करतात. यामुळेच पुन्हा मनामध्ये त्याबद्दल धास्ती, भीती निर्माण होऊन ते लपवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते. या कारणामुळे आज गरज असूनही ९० टक्के व्यक्ती मानसिक आजारावर उपचार करून घेत नाही. यासाठीच मानसिक आरोग्य साक्षरता समाजामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. 

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मानसिक आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ‘मानसिक आरोग्याशिवाय आरोग्य असूच शकत नाही’. मानसिक आजार कोणालाही केव्हाही, कुठेही होऊ शकतो. प्रत्येक पाच प्रौढांमागे एकाला कधीतरी मानसिक समस्येला तोंड द्यावे लागते. आपल्याला भेडसावणा-या अनेक वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांमध्ये मानसिक आजारांचा सहभाग अत्यंत मोठा असतो हे लक्षात घेण्याची गरज आहे. जवळपास ७० टक्के शारीरिक आजारांसाठी उपचार घेणाऱ्या व्यक्ती मानसिक आजारांनी ग्रासलेल्या असतात. मानसिक आजारांचा व्यक्तीच्या सर्वांगांवर परिणाम होतो. 

मानसिक अस्वास्थ्यामुळे अनेक आत्महत्या, अपघात घडतात, कित्येकजण मृत्यूमुखी पडतात. तर काहींना मानसिक आजारांमुळे गंभीर शारीरिक आजारही होतात. एकंदरीत व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करणारे मानसिक आजार व्यक्तीला स्वत:ला आणि इतरांनाही त्रासदायक असतात हे समजून घेणे गरजेचे आहे. मानसिक आजार एकदम अकस्मातपणे फार क्वचित उद््भवतात. कोणताही आजार निर्माण होण्यापूर्वी ते व्यक्तीला काही इशारे देत असतात. पण त्या इशा-यांकडे सर्वसाधारणपणे दुर्लक्ष केले जाते. उदाहरणार्थ, कमी किंवा जास्त आहार सेवन, अती किंवा कमी झोप, अलिप्तता, अती थकवा, शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये अकारण वेदना जाणवणे, असाहाय्यता, निरर्थकतेची भावना, अतिरेकी मद्यपान धूम्रपान, मनामध्ये गोंधळ, वारंवार विस्मरण, अस्वस्थता, प्रचंड काळजी, भावनांमध्ये अत्यंतिक चढ-उतार, स्वत:ला व इतरांना इजा करण्याचे विचार उत्पन्न होणे इत्यादी. परंतु मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची धास्ती, संकोच यामुळे या लक्षणांकडे एक तर दुर्लक्ष केले जाते किंवा स्वत:च्या मनाप्रमाणे त्याचे स्पष्टीकरण केले जाते. यामध्ये बराचसा वेळ निघून जातो आणि आजार तीव्र स्वरूप धारण करतो. म्हणूनच वेळेवर समुपदेशकाचा, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि त्यावर उपचार घेणे अनिवार्य आहे. 

यावर्षीच्या जागतिक, मानसिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती कल्पना, आत्महत्या प्रतिबंधन अशी आहे. आत्महत्या म्हणजे नैराश्याचे अंतिम टोक. जगभरामध्ये  घडणा-या असंख्य आत्महत्येच्या मागे नैराश्य हे प्रमुख कारण आहे. नैराश्यावर वेळेवर उपचार केल्यास आपण आत्महत्या थांबवू शकतो. त्यासाठी गरज आहे मानसिक आरोग्याबद्दलचा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून मन:पूर्वक सामुदायिक कृतीची, जीवन आहे अनमोल, जाणा त्याचे मोल हेच या निमित्ताने नमूद करावेसे वाटते. 

(डॉ. अनघा पाटील मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात क्रियाशील असून विवेकानंद महाविद्यालयात प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत. दिलासा स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष आहेत)

Web Title: Mental health is essential for all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.