लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 08:46 IST2025-08-08T08:45:50+5:302025-08-08T08:46:25+5:30
या अभ्यासाची सुरुवात २०१९ मध्ये कोलकाता विद्यापीठातील प्रा. सुजय घोष यांच्या नेतृत्वाखाली झाली. पाच वर्षांच्या या संशोधनात डॉ. रत्ना चट्टोपाध्याय यांच्यासह इतरांचा समावेश आहे..

लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
कोलकाता : पँटच्या खिशात जास्त वेळ मोबाइल फोन ठेवणे आणि लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करणे यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो आणि ते नपुंसक होण्याचा धोका वाढत असल्याची धक्कादायक बाब कोलकाता विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या जेनेटिक्स रिसर्च युनिट आणि प्रजनन चिकित्सा संस्था (आयआरएम) यांनी केलेल्या संयुक्त अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.
या अभ्यासाची सुरुवात २०१९ मध्ये कोलकाता विद्यापीठातील प्रा. सुजय घोष यांच्या नेतृत्वाखाली झाली. पाच वर्षांच्या या संशोधनात डॉ. रत्ना चट्टोपाध्याय यांच्यासह इतरांचा समावेश आहे..
आपल्याला काय करावे लागेल?
शरीरामध्ये सामान्यतः स्वतःला बरे करण्याची यंत्रणा असते. पण, आपल्या जीनोममध्ये असलेले नैसर्गिक उत्परिवर्तन आपल्याला अनेकदा माहितीही नसते. ही उपचार प्रणाली विद्युतचुंबकीय क्षेत्रांमुळे बिघडण्याची भीती असते. त्यामुळे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
अभ्यासात काय आढळले?
विशिष्ट आनुवंशिक उत्परिवर्तन असलेल्या पुरुषांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या संपर्कामुळे वंध्यत्वाचा धोका जास्त असल्याचे आढळून आले. लॅपटॉप मांडीवर ठेवणे किंवा मोबाइल फोन पँटच्या खिशात ठेवण्यामुळे उच्च तीव्रतेच्या विद्युतचुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते.
या क्षेत्राच्या संपर्कात अंडकोष दीर्घकाळ राहिल्यास त्यासोबत येणाऱ्या उष्णतेसह अंडकोषांतील नाजूक उतींना नुकसान होते, ज्यामुळे शुक्राणू निर्माण करणाऱ्या पेशींवर परिणाम होतो. विशेषतः तरुणांमध्ये ही समस्या चिंताजनक आहे, कारण हे उपकरण ते अधिक वापरतात, असे प्रो. घोष यांनी स्पष्ट केले.
अभ्यासात कुणाचा होता समावेश
संशोधनानुसार, “आयआरएममध्ये पुरुष वंध्यत्वाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना या अभ्यासासाठी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. यामध्ये महिला वंध्यत्वामुळे गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांना किंवा पुरुष वंध्यत्वाच्या (शारीरिक दोषांमुळे) प्रकरणांचा त्यात समावेश नव्हता.
या अभ्यासात विशेषतः अज्ञात कारणांमुळे होणाऱ्या वंध्यत्वाच्या (जसे की अझोस्पर्मिया–वीर्यात शुक्राणूंचा अभाव किंवा ओलिगोझोस्पर्मिया-शुक्राणूंची संख्या कमी असणे) केसेसवर लक्ष केंद्रित करण्यात आले. एकूण सुमारे १,२०० रुग्णांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला.
सहभागी रुग्णांचे वीर्य आणि रक्त नमुने घेण्यात आले. या दोन्ही नमुन्यांमधून डीएनए काढण्यात आला आणि “नेक्स्ट जनरेशन सीक्वेन्सिंग” तंत्राच्या साहाय्याने त्यातील उत्परिवर्तनांचे विश्लेषण करण्यात आले.