थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे वाचाल तर हिवाळ्यातही गरम पाण्याने आंघोळ करणे सोडाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 12:36 IST2020-01-30T12:29:18+5:302020-01-30T12:36:59+5:30
हिवाळ्यात जवळपास सगळेच लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण काही लोक असेही आहेत जे हिवाळाच काय तर उन्हाळ्यातही गरम पाण्याने आंघोळ करतात.

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे वाचाल तर हिवाळ्यातही गरम पाण्याने आंघोळ करणे सोडाल!
हिवाळ्यात जवळपास सगळेच लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण काही लोक असेही आहेत जे हिवाळाच काय तर उन्हाळ्यातही गरम पाण्याने आंघोळ करतात. पण गरम पाण्याने आंघोळ करून चांगलं वाटत असलं तरी जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याचे वेगवेगळे साइड इफेक्ट्सही आहेत.
थंड पाण्याने आंघोळ करण्याचा विचार फारच कमी लोक करतात. कारण थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदेच अनेकांना माहीत नसतात. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, गरम पाण्याने आंघोळ करणं आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर आहे. चला आज आम्ही तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि त्याचं वैज्ञानिक कारण सांगणार आहोत.
अलर्टनेस वाढवणे
mensxp.com या वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सर्वात मुख्य फायदा म्हणजे अलर्टनेस वाढवणे. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने हार्ट रेट वाढतो आणि श्वास घेण्याची व सोडण्याची गतीही वाढते. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने व्यक्ती जास्त अलर्ट होतो. ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावर वेगवेगळा मनोवैज्ञानिक प्रभाव पडतो. यात हृदयाची गति वाढणे, ब्लड प्रेशर वाढणं, श्वासांची गति वाढणे इत्यादींचा समावेश करता येईल.
जर्मनीतील येना मेडिकल कॉलेजच्या एका रिसर्चनुसार, थंड पाण्याने शरीराचं मेटाबॉलिज्म वाढतं. मुळात शरीरावर थंड पाणी टाकल्याने शरीराचं तापमान कमी होऊ लागतं. अशात शरीराला गरम ठेवण्यासाठी किंवा शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्मला जास्त काम करावं लागतं. याने व्यक्तीला वजन कमी करण्यातही मदत मिळते.
इम्यून सिस्टीम मजबूत करा
जर्नल पीलॉस वनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जे लोक थंड पाण्याने आंघोळ करतात ते काम किंवा शाळेत जाण्यासाठी २९ टक्के कमी आजारी पडतात. या रिसर्चमध्ये ३०१८ लोकांचा समावेश करण्यात आला होता. हे सर्वच लोक आधी गरम पाण्याने आंघोळ करत असत. त्यानंतर त्यांना ३० ते ९० सेकंदापर्यंत थंड पाण्याने आंघोळ करण्यासाठी सांगण्यात आले. यातील एका ग्रुपला केवळ गरम पाण्याने आंघोळ करण्यास सांगण्यात आले.
या रिसर्चमधून असे आढळून आले की, ज्या लोकांनी थंड पाण्याने आंघोळ केली ते कमी दिवस आजारी पडले. तसेच असेही समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने लोकांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढली. तसेच त्यांची रोजची कामे करण्याची क्षमताही वाढली.
मूड बूस्ट होतो
काही रिसर्चमधून असेही समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने मूडही बूस्ट होतो. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने न्यूरोट्रान्समीटर जसे की, नॉर एपिनेफ्रीन आणि एंडॉर्फिन्स अॅक्टिव होतात. असंही आढळून आलं आहे की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने लोकांमध्ये डिप्रेशनची लक्षणे कमी होतात.
फिजिकल रिकव्हरी वाढेल
जर्नल ऑफ स्ट्रेंथ अॅन्ड कंडीशनिंग रिसर्चमध्ये प्रकाशित २३ पियर रिव्ह्यूड आर्टिकलमध्ये असं आढळून आलं की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने आणि कॉन्ट्रास्ट वॉटर थेरपी घेतल्याने अंगदुखी दूर होते. तसेच शरीराचा थकवाही दूर करण्यात मदत मिळते.
कशी कराल सुरूवात?
कुणालाही थोडावेळ थंड पाण्याने आंघोळ केल्यावर याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. तुम्ही काही कोमट पाण्याने आंघोळ केल्यावर काही वेळ थंड पाण्याने आंघोळ करू शकता. थंड पाण्याने आंघोळ करण्याचा वेळ ३० सेकंदपासून ते २ मिनिटांपर्यंत असावा. तर काही लोक सांगतात की, ५ ते १० मिनिटे थंड पाण्याने आंघोळ करावी.
काय घ्याल काळजी?
थंड पाण्याने आंघोळ केल्याचे वेगवेगळे फायदे होत असले तरी थंड पाण्याने आंघोळ करण्याला मेडिकल थेरपीचा पर्याय समजू नये. खासकरून अशा लोकांनी हे करू नये जे डॉक्टरांकडून डिप्रेशनचा उपचार घेत आहेत. हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी थंड पाण्याने आंघोळ करणे टाळले पाहिजे. कारण यावेळी हृदयाची गति वाढते. अशात हार्ट अटॅक येण्याचाही धोका असतो.