सायलेंट पेंडामिक : गर्दीमध्येही अनेक जण एकटेच; भारतात ४३% लोक जगताहेत एकाकी आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:09 IST2026-01-12T13:09:11+5:302026-01-12T13:09:48+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने एकाकीपणाला आता 'जागतिक आरोग्य संकट' म्हणून घोषित केले आहे

सायलेंट पेंडामिक : गर्दीमध्येही अनेक जण एकटेच; भारतात ४३% लोक जगताहेत एकाकी आयुष्य
नवी दिल्ली: आजच्या वेगवान युगात इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आले असल्याचे वाटत असले, तरी प्रत्यक्षात मानवी जीवनात एकाकीपणाची दरी निर्माण झाली आहे. एकाकीपणा ही २१ व्या शतकातील एक 'सायलेंट पेंडामिक' बनली असून, जगातील प्रत्येक चौथी व्यक्ती आज स्वतःला एकटे समजत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने एकाकीपणाला आता 'जागतिक आरोग्य संकट' म्हणून घोषित केले आहे. एकाकीपणाचा परिणाम शारीरिक आरोग्यावरही होतो.
काय उपाय करावेत?
सामाजिक संवादः शाळा, कार्यालय आणि कुटुंबात लोकांशी संवाद वाढवा. छंदांना वेळ द्याः स्वतःचे छंद जोपासा, जेणेकरून रिकाम्या वेळेत नकारात्मक विचार येणार नाहीत.
ज्येष्ठांशी, मुलांशी संवाद: घरातील वृद्ध आणि मुलांशी नियमित चर्चा करा
भारतातील स्थिती
भारतामध्ये तरुणांमध्ये एकाकीपणाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आकडेवारीनुसार, १५ ते १९ वयोगटातील प्रत्येक पाचवा तरुण (२०%) एकाकीपणा जाणवत असल्याचे सांगतो. शहरांमध्ये हे प्रमाण अधिक असून ४३ टक्के शहरी लोक एकाकीपणाचा अनुभव घेत आहेत. ६० वर्षावरील ज्येष्ठांमध्ये हे प्रमाण २० ते ३३ टक्क्यांच्या दरम्यान आहे. ग्रीस आणि सायप्रस हे देश जगात एकाकीपणाच्या बाबतीत आघाडीवर असले तरी भारतही या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
एकाकीपणाची कारणे?
बदलती जीवनशैली : लॉकडाऊननंतर सामाजिक अंतर आणि नात्यांमधील भावनिक ओलावा कमी झाला आहे.
नोकरी आणि नात्यांमधील तणाव : बेरोजगारी, कामाच्या ठिकाणचा ताण आणि वैयक्तिक नात्यांमधील कडू संवादामुळे लोक स्वतःला इतरांपासून वेगळे करत आहेत. यातूनच नैराश्य, आत्मविश्वासाची कमतरता या समस्या निर्माण होतात.