dr sanjay oak explains Why people are getting COVID 19 even after getting vaccinated | Corona Vaccination: ...म्हणून लस घेतल्यानंतरही होते कोरोनाची लागण; तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Corona Vaccination: ...म्हणून लस घेतल्यानंतरही होते कोरोनाची लागण; तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांची संख्या महिनाभरापासून झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे. मागील ४ दिवस देशात दिवसाकाठी दीड लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १ लाख ८४ हजार ३७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. (dr sanjay oak explains Why people are getting COVID 19 even after getting vaccinated)

कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार? अखेर उत्तर मिळालं; तुम्हालाही वाटेल दिलासा

एका बाजूला देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. मात्र लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी यामागची काही महत्त्वाची कारणं सांगितली आहेत. 'कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही लागण होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. एखाद्या व्यक्तीनं कोरोनाची लस घेतली, त्यावेळी त्याला लक्षणं दिसत नव्हती. पण ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती. त्या व्यक्तीनं लस घेतल्यावर लक्षणं स्पष्टपणे दिसू लागली. अशा वेळी चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह येणारच,' असं ओक यांनी सांगितलं.

...तेव्हाच रेमडेसिविरचा वापर करावा; कोविड टास्क प्रमुखांची हात जोडून कळकळीची विनंती

कोरोना लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होते. यामागे प्रामुख्यानं दोन शक्यता आहेत. 'तुम्ही कोरोना चाचणी केलेली नव्हती. तुम्ही लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर लक्षणं दिसली म्हणून तुम्ही आरटीपीसीआर केलं आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही एक शक्यता. तर कोरोना लस घेतल्यानंतर तुमचं शरीर विषाणूला प्रत्युत्तर देतं, ते प्रत्युत्तर पॉझिटिव्ह टेस्टच्या माध्यमातून तुमच्या निदर्शनास आलं, ही दुसरी शक्यता,' असं ओक म्हणाले. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यावरही कोरोना होऊ शकतो. पण तो सौम्य स्वरुपाचा असतो. कारण तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्या विषाणूचा मुकाबला करतात, असं ओक यांनी सांगितलं.

देशात कोरोनाची दुसरी लाट असताना भारतासाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारला मोठा दिलासा

कोरोनाची लस घेतली तरीही कोरोना होतोच. मग लस कशासाठी घ्यायची, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नालाही डॉ. ओक यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी स्वत:चं उदाहरण दिलं. 'मला जून जुलैमध्ये तीव्र स्वरुपाचा कोरोना झाला. त्याचं स्वरुप गंभीर होतं. त्यानंतर जानेवारीत मी लसीचा पहिला डोस घेतला. दोन महिन्यांनी दुसरा डोज घेतला. कालच मी माझ्या अँटिबॉडीज तपासल्या. त्या २५० पेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ माझ्या शरीरात प्रतिकारशक्ती आहे. माझ्या शरीरातील अँटिबॉडीज कोरोनापासून माझं रक्षण करतीलच असं नाही. पण मला गंभीर स्वरुपाचा कोरोना होणार नाही. झालाच तरी त्याचं स्वरुप सौम्य असेल,' असं डॉ. ओक म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: dr sanjay oak explains Why people are getting COVID 19 even after getting vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.