CoronaVirus News will reach at peak of second corona wave in next week says covid task force chief dr sanjay oak | CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार? अखेर उत्तर मिळालं; तुम्हालाही वाटेल दिलासा

CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार? अखेर उत्तर मिळालं; तुम्हालाही वाटेल दिलासा

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांची संख्या महिनाभरापासून झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे. मागील ४ दिवस देशात दिवसाकाठी दीड लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १ लाख ८४ हजार ३७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे.

...तेव्हाच रेमडेसिविरचा वापर करावा; कोविड टास्क प्रमुखांची हात जोडून कळकळीची विनंती

गेल्या वर्षी देशात कोरोनाची पहिली लाट आली. त्यावेळी सप्टेंबरच्या मध्यावर कोरोना बाधितांचा आकडा १ लाखाच्या जवळ गेलेला नव्हता. मात्र आता एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सगळेच विक्रम मोडीत काढले. ही लाट केव्हा ओसरणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आपण कोरोना रुग्णवाढीच्या शिखराच्या जवळ पोहोचलो आहोत. पुढच्या आठवड्यात कोरोनाची लाट ओसरू लागेल. दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण कमी होऊ लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.

देशात कोरोनाची दुसरी लाट असताना भारतासाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारला मोठा दिलासा

रेमडेसिविर कधी, केव्हा, कुठे द्यावं?
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोनाबाधितांचे नातेवाईक, कुटुंबीयांची रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कोविड टास्कचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सर्वांना अतिशय कळकळीचं आवाहन केलं आहे. 'रेमडेसिविर जीव वाचवणारं औषध नाही. रेमडेसिविर घेतल्यानं प्राण वाचले असं होत नाही. त्यानं फार फार तर रुग्णाचा रुग्णालयातला कालावधी १ ते २ दिवसांनी कमी होतो,' असं डॉ. ओक यांनी सांगितलं.

औषध विविध प्रकारची असतं. रेमडेसिविर हे अँटिव्हायरल प्रकारात मोडणारं औषध आहे. जेव्हा एखाद्या व्हायरसची शरीरात वाढ मोठ्या प्रमाणात होते, ती रोखण्याचं काम रेमडेसिविर करतं. मी डॉक्टरांना कळकळीची विनंती करून सांगतो की रेमडेसिविर हे लाईफ सेव्हिंग औषध नाही. रेमडेसिविर दिल्यानं प्राण वाचले असं होत नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. शरीरातील ऑक्सिजनची पातळी, व्हिटामिन सी, झिंक, पाण्याचं प्रमाण उत्तम ठेवणं हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. रेमडेसिविर योग्य त्या रुग्णालाच दिलं जावं. ते सरसकट देण्याचं औषध नाही, असं ते पुढे म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News will reach at peak of second corona wave in next week says covid task force chief dr sanjay oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.