डिजिटल डिटॉक्स: खरंच गरज की तात्पुरते फॅड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:53 IST2026-02-11T17:52:56+5:302026-02-11T17:53:41+5:30

Digital Detox : मोबाईल जवळ नसला की अस्वस्थ वाटणे किंवा वारंवार स्क्रीन तपासण्याची सवय लागणे हे डिजिटल अवलंबित्वाची सुरुवातीची लक्षणे मानली जातात.

Digital detox: a real necessity or a temporary fad? know what doctor says about it | डिजिटल डिटॉक्स: खरंच गरज की तात्पुरते फॅड?

डिजिटल डिटॉक्स: खरंच गरज की तात्पुरते फॅड?

डॉ. नीलेश ठाकरे, मानसशास्त्रज्ञ

Digital Detox :  आजच्या काळात मोबाईल फोन, इंटरनेट आणि सोशल मीडिया यांशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पनाही करता येत नाही. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण स्क्रीनच्या सान्निध्यात असतो. संवाद, काम, शिक्षण, करमणूक, नातेसंबंध सगळेच काही डिजिटल माध्यमांद्वारे घडत आहे. अशा वेळी ‘डिजिटल डिटॉक्स’ ही संकल्पना पुढे येते आणि प्रश्न निर्माण होतो ही खरंच गरज आहे की केवळ एक तात्पुरते फॅड?

मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळे आपले मन कायम सजग अवस्थेत राहते. लक्ष एका गोष्टीवर टिकवणे कठीण होते. काम करताना सहज विचलित होणे, चिडचिड, अस्वस्थता, मानसिक थकवा अशा तक्रारी वाढताना दिसतात. मोबाईल जवळ नसला की अस्वस्थ वाटणे किंवा वारंवार स्क्रीन तपासण्याची सवय लागणे हे डिजिटल अवलंबित्वाची सुरुवातीची लक्षणे मानली जातात.

झोपेवर होणारा परिणाम विशेष लक्षात घेण्यासारखा आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉप वापरल्यामुळे झोपेचे नैसर्गिक चक्र बिघडते. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश मेलाटोनिन या झोपेसाठी आवश्यक हार्मोनच्या स्रावात अडथळा आणतो. परिणामी झोप अपुरी होते, झोपेची गुणवत्ता घसरते आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. दीर्घकाळ अशी स्थिती राहिल्यास स्मरणशक्ती, निर्णयक्षमता आणि भावनिक संतुलनावर त्याचा परिणाम होतो.

सोशल मीडियाचा मानसिक प्रभावही दुर्लक्ष करता येणार नाही. सतत इतरांचे ‘परिपूर्ण’ आयुष्य पाहताना आपोआप तुलना सुरू होते. स्वतःबद्दल असमाधान, न्यूनगंड आणि आत्मविश्वास कमी होण्याची भावना निर्माण होऊ शकते. लोकांशी सतत जोडलेले असल्याचा भास असला, तरी प्रत्यक्षात एकटेपणाची भावना अधिक तीव्र होत असल्याचे अनेक संशोधनातून दिसून आले आहे.

या पार्श्वभूमीवर डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना फॅडपेक्षा अधिक महत्त्वाची ठरते. डिजिटल डिटॉक्स म्हणजे तंत्रज्ञानाचा संपूर्ण त्याग नव्हे, तर त्याचा जाणीवपूर्वक आणि संतुलित वापर. जेवणाच्या वेळी मोबाईल बाजूला ठेवणे, झोपण्याच्या किमान एक तास आधी स्क्रीन टाळणे, सोशल मीडियासाठी ठराविक वेळ निश्चित करणे अशा छोट्या सवयी मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

काही जण म्हणतात की डिजिटल डिटॉक्सची जबाबदारी केवळ व्यक्तीवर टाकली जाते, तर कामाच्या ठिकाणी असलेला सतत ‘ऑनलाइन’ राहण्याचा दबाव दुर्लक्षित केला जातो. ही टीका काही अंशी योग्य असली, तरी वैयक्तिक पातळीवर जागरूकता आणि स्वनियंत्रणही तितकेच महत्त्वाचे आहे. जसे आरोग्यदायी आहारासाठी योग्य निवड करावी लागते, तसेच डिजिटल वापरातही मर्यादा ठरवाव्या लागतात.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे प्रगतीला नकार देणे नाही, तर मानसिक समतोल पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न आहे. सततच्या डिजिटल गोंगाटात कधी तरी थांबून स्वतःशी जोडणे ही आजच्या काळातील अत्यावश्यक गरज आहे. योग्य वेळी लॉग-आउट होणे हेही आज लॉग-इन होण्याइतकेच महत्त्वाचे ठरत आहे.

(लेखक एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई येथील मानसशास्त्र विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख आहेत.)

Web Title : डिजिटल डिटॉक्स: आवश्यकता या दिखावा? कल्याण के लिए तकनीक का संतुलन

Web Summary : डिजिटल डिटॉक्स मानसिक कल्याण के लिए एक आवश्यकता है, न कि सिर्फ एक चलन। लगातार सूचनाएं और सोशल मीडिया तुलना नींद, फोकस और आत्म-सम्मान को प्रभावित करती हैं। स्क्रीन टाइम सीमित करने जैसे सचेत तकनीक का उपयोग, मानसिक संतुलन हासिल करने के लिए आवश्यक है।

Web Title : Digital Detox: Necessity or Fad? Balancing Tech Use for Well-being

Web Summary : Digital detox is crucial, not just a trend, for mental well-being. Constant notifications and social media comparisons impact sleep, focus, and self-esteem. Conscious tech use, like limiting screen time, is essential for regaining mental balance and reducing digital dependency.