डायबेटिस आणि आंबा... ओ भाऊ, थोडं थांबा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 02:53 PM2018-04-09T14:53:04+5:302018-04-09T14:53:04+5:30

ज्ञानेश्वरांनी पसायदानात ‘ज्याला जे हवे ते मिळो’ असं म्हटलंय. त्यांनी खरे तर, ‘ज्याला जे हवे ते मिळते’, असे म्हणायला हवे होते. पुण्यात लक्ष्मीरोडवरून चालत जाताना बघा. स्त्रीपुरुष जोडीने चालताना दिसले तर नीट बघा.

Diabetes and mango ... Oh brother, wait a bit! | डायबेटिस आणि आंबा... ओ भाऊ, थोडं थांबा!

डायबेटिस आणि आंबा... ओ भाऊ, थोडं थांबा!

googlenewsNext

- डॉ. नितीन पाटणकर (मधुमेहतज्ज्ञ)

ज्ञानेश्वरांनी पसायदानात ‘ज्याला जे हवे ते मिळो’ असं म्हटलंय. त्यांनी खरे तर, ‘ज्याला जे हवे ते मिळते’, असे म्हणायला हवे होते. पुण्यात लक्ष्मीरोडवरून चालत जाताना बघा. स्त्रीपुरुष जोडीने चालताना दिसले तर नीट बघा. त्यातील एक जण आजुबाजूच्या दुकानातील साड्या दाखवीत असतो आणि दुसरा म्हणत असतो, ‘मला काही दिसायला नको, मला काही ऐकू यायला नको’. हे त्या जोडीतील एकजण मागतो आणि त्याला ते मिळतेच. इथपर्यंत वाचत आला असाल तर तुमच्या लक्षात आलेच असेल की, मी इथे स्त्रीपुरुष असा भेदभाव केलेला नाही. असे अनेक अनुभव अनेकांना आले असतील. 

मेडिकल रिसर्च हा असाच ‘ जो जे वांछील तो ते लाहो’ या पद्धतीने बघितला जातो. मागे केव्हातरी, दारू पिण्याने रक्ताभिसरण सुधारते असे दिसून आले. या शोधनिबंधात कुठेही दारूमुळे लिव्हर खराब होत नाही असे म्हटलेले नव्हते. पण सर्व ‘पियकर आणि पेयसींनी’ या शोधाचा उपयोग ‘लायसेन्स टू ड्रिंक’ असाच केला. पूर्वी मुतखडा झाला की ‘बियर हे औषध’ आहे असे सांगून बियर पीत. तसेच पुढे ‘मला हार्ट ट्रबल आहे म्हणून’ मला दारू प्यावी लागते असे सांगणारे विद्वानही पण आपण बघितले असतील. कुठचीही गोष्ट ही पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसते. ज्या गोष्टी माणसाला खूप आवडतात त्यात व्यसन लागण्याचे गुण असतात तसेच त्यात बऱ्यावाईट गोष्टीही असतात. लोकाच्या डोळ्यातलं कुसळ दिसते पण स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही असं म्हणतात. तसेच आपल्या आवडत्या पदार्थातील गुण दिसतात दोष दिसत नाहीत.
 
हे आठवण्याचे कारण म्हणजे आता आंब्याचा सीझन चालू होतोय. आंब्यामधील कुठच्यातरी द्रव्यामुळे डायबेटीस कमी होतो वगैरे संशोधने वाचून गोंधळ उडालेला आहे. पण, पूर्वी आंब्यातून जितकी साखर आणि कॅलरी मिळायच्या तेवढ्याच आत्ताही मिळतात. एखादे केमिकल आणि छोटासा शोधनिबंध यावर विसंबून लोक सल्ला देतात, “खा लेको आंबे, काही होत नाही त्रास, झाला तर फायदाच होतो”. लोकांना काय, ‘मला आवडतात त्या गोष्टी खा’  म्हणून सांगणारा सल्ला आवडतो. मग काय सीझनला आंब्यावर आडवा हात मारला जातो. पुढे तुमच्या डायबेटीसचे काय व्हायचे ते होवो. 

सत्य बोला, प्रिय बोला पण अप्रिय सत्य बोलू नका अशा अर्थाची म्हण आहे. हल्ली ती म्हण वेगळ्या रितीने वापरतात. 

सत्य वा असत्य बोला, पण प्रिय बोला. कलिंगड, उसाचा रस, आंबा इत्यादी खाण्याची वांछना असेल तर तसेच सल्ले दिसत राहतील. तेव्हा चला पसायदान म्हणूया, ‘जो जे वांछील तो ते लाहो’.

Web Title: Diabetes and mango ... Oh brother, wait a bit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.