थंडीतही ‘कांजण्या’चा विळखा; बदलत्या हवामानाचा फटका! काळजी कशी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:50 IST2026-01-29T19:48:36+5:302026-01-29T19:50:18+5:30

हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे थंडीच्या दिवसांतही कांजण्याचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. कांजण्या हा विषाणूजन्य आजार आहे. जो ‘वेरिसेला जोस्टर’ विषाणूमुळे होतो.

Chickenpox outbreaks even in cold weather; A blow from changing weather! How to take care? | थंडीतही ‘कांजण्या’चा विळखा; बदलत्या हवामानाचा फटका! काळजी कशी घ्याल?

थंडीतही ‘कांजण्या’चा विळखा; बदलत्या हवामानाचा फटका! काळजी कशी घ्याल?

- सुमेध वाघमारे, नागपूर
एरवी उन्हाळ्याच्या काहिलीत उद्भवणारा 'कांजण्या' (चिकनपॉक्स) हा आजार आता नागपूरच्या थंडीतही आपले डोके वर काढत आहे. ऋतूचक्रातील अनपेक्षित बदलांमुळे आणि वातावरणातील अनियमिततेमुळे थंडीच्या दिवसांतही कांजण्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने लहान मुलांच्या बाबतीत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन बालरोग तज्ज्ञ व मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी केले आहे. 

कांजण्या हा विषाणूजन्य आजार आहे. जो ‘वेरिसेला जोस्टर’ विषाणूमुळे होतो. सामान्यत: लहानपणी लसीकरण न झाल्याने वयाच्या १५ वर्षांपर्यंत होतो. एप्रिल ते जुलै या दरम्यान हा आजार पसरतो. चिकन पॉक्सला ‘वेरिसेला’या नावानेही ओळखले जाते. आयुष्यात एकदाच हा आजार होतो. या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर १० ते २१ दिवसांत लक्षणे दिसायला सुरुवात होतात आणि पुढील ५ ते १० दिवसांपर्यंत ती लक्षणे तशीच राहतात. कांजण्या कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय होणारा आजार आहे. 

सुरुवातीची लक्षणे

अंगावर लालसर पुरळ उठणे, तीव्र खाज सुटणे आणि प्रचंड अशक्तपणा जाणवणे. काही दिवसांत या लाल पुरळांचे रूपांतर पाण्याने भरलेल्या फोडांमध्ये होते. हे फोड फुटल्यास किंवा त्यातील द्राव संपर्कात आल्यास संसर्ग अधिक वेगाने पसरतो.

बंद खोल्या आणि गर्दी ठरू शकते घातक

थंडीमुळे मुले जास्त वेळ घरामध्ये किंवा बंद खोल्यांमध्ये राहतात. शाळा, क्लासेस किंवा वसतिगृहांमध्ये मुलांचा एकमेकांशी जवळचा संपर्क येतो. अशा ठिकाणी एका मुलाला संसर्ग झाल्यास तो इतर मुलांमध्ये वेगाने पसरतो. त्यामुळे लक्षणे दिसताच मुलाला गर्दीच्या ठिकाणी पाठवणे टाळावे.

काय उपाय करावेत

लसीकरण: कांजण्यावर प्रभावी लस उपलब्ध आहे. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता ९० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.

स्वच्छता: हात वारंवार साबणाने धुणे आणि मुलांच्या नखांची निगा राखणे (खाजवल्यामुळे संसर्ग पसरू नये म्हणून).

विलगीकरण: बाधित रुग्णाचे कपडे, टॉवेल आणि भांडी स्वतंत्र ठेवावीत.

वैद्यकीय सल्ला: घरगुती उपाय किंवा स्वत:हून औषधे न घेता तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच उपचार घ्यावेत.

घरगुती उपचार नको

कांजण्या आल्यावर अनेकदा 'देवीचा कोप' समजून घरगुती उपचारांकडे कल असतो. मात्र, वैद्यकीय दृष्टिकोनातून हा विषाणूजन्य आजार असून वेळीच उपचार न मिळाल्यास गुंतागुंत वाढू शकते. स्वच्छता आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन हाच यावरचा उत्तम उपाय आहे.

तात्काळ डॉक्टरांचा सल्ला आवश्यक 

सध्याच्या बदलत्या ऋतूमानानुसार आजारांचे स्वरूप बदलत आहे. कांजण्या टाळण्यासाठी लसीकरण हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे. जर मुलाला ताप किंवा पुरळ येत असेल, तर त्याला शाळेत न पाठवता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शास्त्रीय उपचारांवर भर द्यावा.
- डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ व वैद्यकीय अधीक्षक मेडिकल

Web Title : सर्दी में भी चेचक का प्रकोप: जलवायु परिवर्तन का प्रभाव, निवारक उपाय।

Web Summary : नागपुर में अनियमित मौसम के कारण सर्दियों में चेचक का प्रकोप बढ़ रहा है। डॉ. गावंडे के अनुसार टीकाकरण और स्वच्छता महत्वपूर्ण है। घरेलू उपचारों से बचें; तत्काल चिकित्सा सलाह लें।

Web Title : Chickenpox outbreak in winter: Climate change impact, preventive measures.

Web Summary : Nagpur sees winter chickenpox surge due to erratic weather. Vaccination, hygiene crucial, says Dr. Gawande. Avoid home remedies; seek immediate medical advice.