मुंबई : जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्ताने २० ते ३० या वयोगटातील तरुणांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. यातून असे दिसून आले की, तब्बल ४३ टक्के तरुणांना रक्तदाबाची सामान्य पातळी माहीतच नसते. गेल्या काही वर्षांत उच्च रक्तदाब आणि त्याच्याशी संबंधित आजार असलेल्या तरुणांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. असे असूनही तरुण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत.या सर्वेक्षणानुसार ३० ते ६० या वयोगटातील ३० टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. आॅनलाइन सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५०० व्यक्तींपैकी १९४ व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यापैकी २४ व्यक्ती २०-३० या वयोगटातील आणि १५० व्यक्ती ३० ते ५० या वयोगटातील होत्या. यांच्यापैकी केवळ २३ व्यक्ती दर महिन्याला त्यांचा रक्तदाब तपासून घेतात. रक्तदाबाची सामान्य पातळी ९० ते १४० आहे आणि ५०० जणांपैकी केवळ २१८ व्यक्तींनाच ही आकडेवारी माहीत होती.याविषयी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रतीक सोनी यांनी सांगितले की, आजच्या विकसनशील देशांमध्ये जीवनशैली, ताण, कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण आणि खानपानाच्या सवयी बदलल्या पाहिजेत. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत थोडी तरी शिस्त पाळणे आवश्यक आहे.
४३ टक्के तरुणांना रक्तदाबाची सामान्य पातळी माहीत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:49 IST