गोंदिया - नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वनपरिक्षेत्रात अज्ञात इसमांनी गुरुवारी अज्ञात इसमानी आग लावली. या आगीने उग्र रुप धारण केले होते. ही आग विझविताना तीन हंगामी वन मजुरांचा यात होरपळून मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री (दि.८) उशीरा उघडकीस आली. राकेश युवराज मडावी (४०) रा. थाडेझरी, रेखचंद गोपीचंद राणे (४५) रा. धानोरी, सचिन अशोक श्रीरंगे (२७) रा. कोसमतोंडी असे मृतक मजुरांची नावे आहे. तर विजय तिजाब मरस्कोल्हे (४०) रा. थाडेझरी व राजू श्यामराव सयाम (३०) रा. बोळूंदा जि. गोंदिया असे गंभीर जखमी असलेल्या मजुरांची नावे आहे. त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९८,९९, १००, ९७ मध्ये गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली. ही आग विझविण्याचे काम ५० ते ६० वन कर्मचारी व हंगामी मजूर करीत होते. सायंकाळी ६ वाजतापर्यंत आग काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र याच दरम्यान पुन्हा हवाधुंद सुरु झाल्याने वनवा वाढला. वनवा विझवित असताना अचानक आगीने चारही बाजुने वनमजुरांना वेढा घातला व हा परिसर पहाडीवर असल्याने वनमजुरांना कुठलीच हालचाल करता आली नाही. त्यामुळे मध्यभागी पाच ते सहा मजूर अडकले. यात तीन मजुरांचा होरपळून घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन मजूर गंभीर झाले. हे सर्व वनमजूर हंगामी वनमजूर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. हा सर्व घटनाक्रम गुरुवारी रात्रीपर्यंत सुरु होता असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे वन मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फायर ब्लोअरचा स्फोट झाल्याची माहिती उन्हाळ्याच्या दिवसात तेंदूपत्ता आणि मोहफुल संकलन करण्यासाठी काही नागरिक जंगलात आग लावतात. याच आगीचे रुपातंर वनव्यात होेते. दरम्यान गुरुवारी नागझिरा व पिटेझरी वन परिक्षेत्रात यामुळेच आग लागल्याचे बोलल्या जाते. तर जंगलातील वनवा विझवित असताना फायर ब्लोअरचा स्फोट झाल्याने आगीने उग्र रुप धारण केल्याने यामुळेच तीन हंगामी वनमजुरांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जाते. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला नाही. घटनेची माहिती देणे टाळलेनागझिरा व पिटेझरी वन परिक्षेत्रात गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वनवा लागला. त्यानंतर वनवा विझविण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. पण यात तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची बाब वन व वन्यजीव विभागाने पुढे येऊ दिली नाही. त्यानंतर शुक्रवारी (दि.९) सकाळच्या सुमारास याची माहिती दिली. गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण वनवा विझविताना तीन हंगामी वन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर झाले. हे सर्व मजूर सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, थाडेझरी आणि बोळूंदा येथील आहेत. या घटनेचे वृत्त गावकऱ्यांमध्ये पसरताच त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला.
जंगलातील वणवा विझवितांना तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 09:49 IST