कंटेनर उलटून ३५ जनावरे ठार; देवरी वासनी ढासगडजवळील घटना

By अंकुश गुंडावार | Updated: February 5, 2025 22:08 IST2025-02-05T22:06:49+5:302025-02-05T22:08:42+5:30

कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक

Speeding container transporting illegal animals overturned killing 35 animals in Gondia | कंटेनर उलटून ३५ जनावरे ठार; देवरी वासनी ढासगडजवळील घटना

कंटेनर उलटून ३५ जनावरे ठार; देवरी वासनी ढासगडजवळील घटना

देवरी (गोंदिया) : जनावरांची अवैध वाहतूक करणारा भरधाव कंटेनर उलटून ३५ जनावरे ठार झाल्याची घटना देवरी तालुक्यातील वासनी ढासगड फाट्यावर बुधवारी (दि.५) सकाळी १०:१६ वाजता घडली. या दुर्दैवी घटनेनंतर गोपालकांनी तीव्र रोष व्यक्त करत जनावरांची कत्तलखान्यात वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

प्राप्त माहितीनुसार गुरुवारी सकाळी १०:१६ वाजताच्या सुमारास कंटेनर क्रमांक एम.एच.३०, बीडी १०९५ मधून जनावरांची कत्तलखान्यात वाहतूक केली जात होती. या कंटेनरमध्ये ३५ लहान-मोठी जनावरे होती. ही जनावरे कत्तलखान्यात वाहून नेत असताना देवरी तालुक्यातील वासनी ढासगड फाट्याजवळ हा भरधाव कंटेनर उलटल्याने त्यातील ३५ जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती चिचगड पोलिस स्टेशनला मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी त्यांना कंटेनेर क्रमांक एम.एच.३०, बीडी १०९५ रस्त्यालगत उलटलेला आढळला. दरम्यान, कंटेनरजवळ दोन व्यक्ती आढळले त्यांची पोलिसांनी चौकशी केली असता यापैकी एकाने आपले अब्दुल राजिक अब्दुल खालिक (३१, रा.पठाणपुरा वाॅर्ड मूर्तिजापूर) असे असून या कंटेनरचा चालक असल्याचे सांगितले. छत्तीसगड राज्यातील कडीबाजार (जि. बालोद) येथून कंटेनरमध्ये जनावरे भरून ती काेरची-देवरी-नागपूरमार्गे मूर्तिजापूर येथे नेत असताना कंटेनर उलटून हा अपघात झाल्याचे सांगितले. पोलिसांनी कंटेनरचा दरवाजा उघडून पाहिला असता आतमध्ये ३५ जनावरे मृतावस्थेत आढळली. ही जनावरे कोंबलेल्या व गळ्याला आणि पायाला दोरी बांधून असल्याने त्यांची कत्तलखान्यात वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांना पिपरखारी जंगलात दफन करण्यात आले.

कंटेनर चालकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी चिचगड पोलिसांनी ट्रकचालक अब्दुल राजिक अब्दुल खालिक (३१) यांच्या विरुध्द कलम ११(१)(ड) प्रा.नि.वा.का, सहकलम ५(अ),६,९ (अ)महा. पशुसंवर्धन अधिनियम १९७६, सहकलम २८१,१२५ (अ) भान्यासं २०२३ सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे तसेच कंटेनरसह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


छत्तीसगडवरुन नेते होते जनावरे

देवरी तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या भागातून गेल्या काही महिन्यांपासून जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे. जनावरांची तस्करी करणारे या परिसरातील जंगलातील मार्गाचा अवलंब करतात. जनावरांची कत्तलखान्यात वाहतूक करण्यासाठी तस्कर आता कंटेनरचा उपयोग करत आहे. छत्तीसगड राज्यातील कडीबाजार येथून कंटेनरमध्ये जनावरे भरून त्यांची मूर्तिजापूर येथे वाहतूक केली जात असताना हा अपघात घडला.

महिनाभरात तिसरी कारवाई

जनावरांची कत्तलखान्यात तस्करी करणारे छत्तीसगड-कोरची या जंगलातील मार्गाचा वापर करत आहे. चिचगड पोलिसांनी या मार्गावर मोहीम राबवून तीन वाहने जप्त केल्याचे पोलिस उपनिरीक्षक कैलास खासबागे यांनी सांगितले.

Web Title: Speeding container transporting illegal animals overturned killing 35 animals in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.