अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण भोवले, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव निलंबित

By अंकुश गुंडावार | Published: October 21, 2023 04:44 PM2023-10-21T16:44:42+5:302023-10-21T16:45:42+5:30

पुन्हा दोघांवर कारवाईची टांगती तलवार

Sadak Arjuni Forest Range Officer Suresh Jadhav suspended over illegal teak felling case | अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण भोवले, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव निलंबित

अवैध सागवान वृक्षतोड प्रकरण भोवले, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव निलंबित

सडक अर्जुनी (अमरावती) : येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अधिकारी सुरेश जाधव यांना अवैध वृक्षतोड प्रकरणी चौकशीेनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपवनसंरक्षक जयरामगौडा आर यांनी २० ऑक्टोबर रोजी केली. तर याच प्रकरणात पुन्हा दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार सात आठ महिन्यापुर्वी सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील शेंडा क्षेत्रातील वन कक्ष क्रमांक ६७६ ( संरक्षित वन) १७२ (राखीव वन) ६८८, ७०३, ६८१ व ६७१( संरक्षित वन ) मध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ४५ वृक्षाची अवैध वृक्षतोड करण्यात आली होती. या वृक्षांची किमत ४ लाख ८ हजार २०० रुपये आहे. तर यापैकी १६ नग म्हणजे ५४ हजार ६९१ रुपयांचे लाकूड वन परिक्षेत्र अधिकारी जाधव यांनी जप्त केले होते. पण या प्रकरणात वृक्षतोड करणाऱ्या अभय देत व एकूण वृक्षतोड केलेला पुर्ण लाकूडफाटा जप्त केला नाही. परिणामी शासनाचे ३ लाख ५३ हजार ५३४ रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान याप्रकरणाची काही गावकऱ्यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने वनविभागाने चौकशी केली. चौकशीत स्पष्ट झाल्याने उपवनसंरक्षक जयरामगौडा आर यांनी शुक्रवारी (दि.२०) सडक अर्जुनीचे वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत सुरेश जाधव यांना मुख्यालय उपवनसंरक्षक गोंदिया येथे कार्यरत रहावे लागणार आहे. तर सडक अर्जुनी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा अतिरिक्त कारभार डोंगरगाव आगाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले आहे.

अवैध वृक्षतोडीला दुजोरा

सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून जंगलातील अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणाची चर्चा सुरू होती. याची काही गावकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार सुध्दा केली होती. त्याच अनुषंगाने वन विभागाने या प्रकरणाची चौकशी केली. त्यात अवैध वृक्षतोड झाल्याचे सिध्द झाल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर याच प्रकरणात सहभागी असणाऱ्या पुन्हा दोन अधिकाऱ्यांवर सुध्दा निलंबनाची टांगती तलवार आहे. त्यामुळे या कारवाईकडे सडक अर्जुनी तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sadak Arjuni Forest Range Officer Suresh Jadhav suspended over illegal teak felling case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.