ऑक्सिजन सिलिंडरचा स्फाेट होऊन रुग्णवाहिका जाळून खाक ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:44 IST2025-11-13T19:43:23+5:302025-11-13T19:44:09+5:30
Gondia : प्राप्त माहिती नुसार देवरी तालुक्यातील चिचगड ग्रामीण रुग्णालयाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत बिघाड आल्याने ती रुग्णवाहिका गुरुवारी दुपारी टो करुन गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील मांडोदेवी वर्कशॉपमध्ये आणण्यात आली होती.

Oxygen cylinder explodes, ambulance burns to ashes; fortunately, no casualties
गोरेगाव : तालुक्यातील मुंडीपार-तेढा मार्गावरील मांडोदेवी वर्कशॉप येथे प्राथमिक आरोग्याच्या दुरुस्तीसाठी आणलेल्या रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिका जळून खाक झाली. तर रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने मुंडीपार परिसर हादला. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना गुरुवारी (दि.१३) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहिती नुसार देवरी तालुक्यातील चिचगड ग्रामीण रुग्णालयाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत बिघाड आल्याने ती रुग्णवाहिका गुरुवारी दुपारी टो करुन गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील मांडोदेवी वर्कशॉपमध्ये आणण्यात आली होती. रुग्णवाहिका वर्कशॉपच्या परिसरात उभी केल्यानंतर अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला. यानंतर काही क्षणातच आग लागली आणि ती वेगाने पसरली. दरम्यान रुग्णवाहिकेच्या आत असलेल्या ऑक्सिजन सिलेंडर आग लागून स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरातील नागरिक बाहेर पडून घटनास्थळी धावले. काही क्षणातच रुग्णवाहिका पुर्ण जळून खाक झाली घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचेपर्यंत आगीत रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली. रुग्णवाहिकेच्या विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास गोरेगाव पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी वर्कशॉपमधील अन्य वाहनांना वेळीच सुरक्षित स्थळी हलविल्याने मोठा अनर्थ टळला.
सिलिंडरच्या स्फाेटामुळे तुकडे उडाले
रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीत ऑक्सिजन सिलिंडरच स्फोट झाला. यामुळे रुग्णवाहिकेच्या काचाचे आणि पत्र्याचे तुकडे परिसरात उडाले. त्यामुळे रस्त्यालगतच्या एका घराला आग लागली होती. मात्र घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवित आग विझली. त्यामुळे अनर्थ टळला.