माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:44 IST2025-12-08T14:42:25+5:302025-12-08T14:44:21+5:30
Gondia Crime News: ६ डिसेंबर रोजी सरिता अग्रवाल या महिलेच्या मृत्यू प्रकरणी खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. सासरच्या मंडळींनी तिची हत्या केली असल्याचे महिलेच्या भावाने म्हटले आहे.

माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरातील गणेश अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक-३०१ मध्ये सरिता अग्रवाल यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. शनिवारी (६ डिसेंबर) घडलेल्या घटनेबद्दल विवाहित महिलेच्या भावाने आता गंभीर आरोप केले आहेत. तिची आत्महत्या नसून तिला बेदम मारहाण करून पती आणि सासऱ्यांनी तिचा गळा चिरल्याचा आरोप तिचा भाऊ भाऊ प्रदीप गुप्ता यांनी केला आहे. तिचा खून करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सरिता पराग अग्रवाल (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता सरिता पराग अग्रवाल या विवाहितेने स्वतःच्या घरीच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कांगावा करण्यात आला, परंतु तिची आत्महत्या नसून तिला बेदम मारहाण केल्यानंतर गळा आवळून तिचा खून करण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
तिचा गळा आणि शरीर बघू दिलं नाही
तिच्या शरीरावर मारहाणीच्या विविध जखमा आहेत. गळा चिरलेला होता. त्यामुळे माहेरच्या मंडळींना सासरची मंडळी तिचा गळा किंवा शरीर पाहू देत नव्हते. यामुळे माहेरच्यांना आणखीनच संशय बळावला. त्यांनी सरिताच्या पार्थिवाचे निरीक्षण केल्यावर तिच्या गळ्याला चिरल्याने दिसले, असा आरोप सरिता अग्रवाल यांच्या भावाने केला आहे.
सोबतच तिच्या शरीरावर विविध ठिकाणी जखमा आढळल्या आहेत. सरिता ही छत्तीसगड राज्यातील असून ७ जून २०२३ रोजी परागसोबत तिचे लग्न झाले होते. परागपासून तिला एक १४ महिन्यांचे बाळ आहे. त्या बाळाच्या पायालाही जखम आहे, असेही म्हटले आहे.