लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी (दि.१३) जाहीर झाला. या निकालाने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सुखद धक्का दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या परीक्षेत मायलेक एकाचवेळी उत्तीर्ण झाल्याने दोघांचाही आनंदाला पारा उरला नव्हता तर कुटुंबात सुध्दा आनंदाचे वातावरण होते.
शीतल राजेंद्रसिंह दीक्षित व अर्थव राजेंद्र दीक्षित असे दहावी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या आई व मुलाचे नाव आहे. त्या दोघांनी फेब्रुवारी २०२५ इयत्ता दहावीची परीक्षा दिली. अर्थव हा गोंदिया येथील मारवाडी शाळेचा विद्यार्थी आहे तर शीतल दीक्षित या गृहिणी आहेत. त्यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याला पती व कुटुंबीयांनी सुद्धा पाठिंबा देत प्रोत्साहान दिले. अर्थवसुद्धा दहावीला असल्याने दोघांनीही एकाच पुस्तकातून दहावीचा अभ्यास केला. विशेष म्हणजे परीक्षेच्या कालावधी माय-लेकांनी एकत्र मिळून अभ्यास केला. आईला अभ्यासात येणाऱ्या अडचणी अर्थव सोडविण्यास मदत करत होता. दोघांनीही परीक्षेची चांगली तयारी केली होती त्यामुळे माय-लेकाला परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा पूर्णपणे आत्मविश्वास होता. मंगळवारी दहावीचा निकाल असल्याने माय-लेकाला निकालाची उत्सुकता होती. निकाल जाहीर झाल्यानंतर दोघांनीही मोबाइलवर ऑनलाइन निकाल पाहिला. त्यात आई शीतल दीक्षित या ६८ टक्के गुण प्राप्त करून तर मुलगा अर्थने ७८ टक्के गुण प्राप्त केले. दोघेही मायलेक प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने दोघांसह कुटुंबीयांनासुद्धा आनंद झाला. कुटुंबीयांनी दोघांचेही पेढा भरून कौतुक केले.
आता पुढच्या परीक्षेची तयारी करणारशीतल दीक्षित यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आता त्या बारावीची परीक्षा देऊन पुढील शिक्षण घेणार आहे. तसेच अर्थवला चांगले मार्गदर्शन करून मोठा अधिकारी करायचे असल्याचे शीतल दीक्षित यांनी सांगितले. एकाच वेळी दहावी उत्तीर्ण झालेल्या मायलेकाचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. सतीश बनसोड यांनी दीक्षित यांच्या घरी जाऊन सत्कार केला.