तिचे नाव, गाव विचारत हात पकडून नेले झुडुपांत ; विनयभंग प्रकरणात आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास
By नरेश रहिले | Updated: November 26, 2025 18:17 IST2025-11-26T18:15:47+5:302025-11-26T18:17:17+5:30
जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल: ६ हजाराचा दंडही ठोठावला

He took her by the hand and took her to the bushes, asking her name and village; Accused gets 3 years rigorous imprisonment in molestation case
गोंदिया : विनयभंग प्रकरणातील आरोपी सुभाष उर्फ मड्या श्रीराम मडावी (४९) रा. डोंगरगाव डेपो, ता. सडक-अर्जुनी याला जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ वर्षांचा सश्रम कारावास व ६ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा २६ नोव्हेंबर रोजी ठोठावली आहे.
४५ वर्षांची पिडीत महिला रा. चांदलमेठा हिने १९ ऑक्टोबर २०२४ रोजी देवरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्या दिवशी ती डोंगरगाववरून खुर्शीपार येथे पायी जात असताना सर्व्हिस रोडवर आरोपी मडावी तिच्या मागे लागला. थोड्याच वेळात आरोपी तिच्या जवळ येऊन नाव गाव विचारत तिचा हात पकडून झुडुपांत ओढत नेले आणि विनयभंग केला.
या घटनेदरम्यान परिसरातील काही नागरिकांनी प्रकार पाहून तत्काळ धाव घेत पीडितेला आरोपीच्या तावडीतून सोडविले. नंतर तिला डोंगरगावच्या पोलीस पाटलांकडे सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले व त्यांच्या मदतीने देवरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून देवरी येथील तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उनिरीक्षक गीता मुळे यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध कलम ७४, ७५(२), ७८(२) अंतर्गत दोषारोपपत्र सादर केले. त्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या देखरेखीत पोलीस हवालदार ब्रिजलाल राऊत यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहकार्य केले.
५ साक्षदार तपासले
सरकारी वकील ॲड. कृष्णा पारधी यांनी सरकार/पीडित पक्षातर्फे ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. जोशी यांनी सर्व पुरावे व साक्षांचा नीट अभ्यास करून आरोपीला शिक्षा सुनावली.
अशी सुनावली शिक्षा
भारतीय न्याय संहिता कलम ७४ अंतर्गत २ वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड (न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास), कलम ७५ (२) अंतर्गत १ वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड (न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारावास) एकूण ३ वर्षांचा सश्रम कारावास व ६ हजार रुपये दंड ठोठावला आहे.