गोंदियातील शेतकऱ्यांचे ४१९ कोटी रुपयांचे चुकारे थकले, रब्बी हंगाम अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:25 IST2026-01-06T13:24:01+5:302026-01-06T13:25:20+5:30
उधार उसनवारी करून गरज भागविण्याची वेळ : दोन महिन्यांपासून निधी मिळेना

Farmers in Gondia owe Rs 419 crore, Rabi season in trouble
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या ५२ हजार शेतकऱ्यांचे ४१९ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या दोन महिन्यांपासून थकले आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत आला असून, गरज भागविण्यासाठी नातेवाईक यांच्याकडे उधार उसनवारी करून गरज भागवावी लागत आहे.
खरीप हंगामातील धान खरेदीला यंदा नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ६३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी आतापर्यंत ५२ हजार ३५ शेतकऱ्यांनी १७ लाख ७० हजार ७३० क्विंटल धानाची विक्री १८७ केंद्रांवरून केली आहे.
या शेतकऱ्यांचे धानाचे चुकाऱ्याचे ४१९ कोटी रुपये मागील दोन महिन्यांपासून थकले आहे. धान खरेदीला सुरुवात होऊन दोन महिने पूर्ण झाले असून, आता तिसऱ्या महिन्याला सुरुवात झाली आहे. मात्र शासनाकडून अद्यापही चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे थकीत चुकाऱ्यांचा आकडा ४१९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शेतकरी खरीप व रब्बी हंगामात धानाची लागवड करतात. खरिपातील धानाची विक्री करून रब्बी हंगामाचे नियोजन करतात. मात्र, खरिपातील विक्री केलेल्या धानाचे चुकारे थकले असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. तर गरज भागविण्यासाठी त्यांना नातेवाईक आणि सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.
बोनसबाबत शंका
शासनाकडून दरवर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान म्हणून प्रतिहेक्टरी बोनस जाहीर केला जातो; पण यंदा हिवाळी अधिवेशनात शासनाने बोनसची घोषणा केली नाही. तर आधीच विविध योजनांचे अनुदान थकले असल्याने यंदा शासनाकडून बोनस जाहीर केला जातो की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.