रणरणत्या उन्हात ही रणरागिणी कर्तव्यदक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:08+5:30
सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास वीस महिला पोलीस शिपाई वेगवेगळ्या ठिकाणी सतत नाकाबंदी करीत आहेत. रणरणत्या उन्हातही आपल्या कर्तव्यापासून तिळमात्रही विचलित होताना दिसत नाही. त्यांच्या या कर्तव्य दक्षतेमुळे संपूर्ण सालेकसा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात यश मिळत आहे. सालेकसा तालुका भौगौलिकदृष्टया तीन राज्याच्या सीमेवर असून या तालुक्याची नाकेबंदी करणे मोठे आव्हान आहे.

रणरणत्या उन्हात ही रणरागिणी कर्तव्यदक्ष
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : कोरोनावर मात करण्यासाठी देशात युध्द पातळीवर संघर्ष सुरु आहे. या महायुध्दात वैद्यकीय कर्मचारी लढा देत आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दिवसरात्र पहारा देत आहेत. या संघर्षामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सुध्दा पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांदाला खांदा लावून कर्तव्य बजावित आहेत.
सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास वीस महिला पोलीस शिपाई वेगवेगळ्या ठिकाणी सतत नाकाबंदी करीत आहेत. रणरणत्या उन्हातही आपल्या कर्तव्यापासून तिळमात्रही विचलित होताना दिसत नाही. त्यांच्या या कर्तव्य दक्षतेमुळे संपूर्ण सालेकसा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात यश मिळत आहे. सालेकसा तालुका भौगौलिकदृष्टया तीन राज्याच्या सीमेवर असून या तालुक्याची नाकेबंदी करणे मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सध्या आपले सगळे कौटुंबीक सुख बाजूला ठेवून या वेळी फक्त राष्ट्रीय कर्तव्य बजावणाला महत्त्व दिले आहे. काही महिला पोलीस कर्मचारी आपल्या अनेक व्यक्तीगत समस्यांपासून त्रस्त आहेत. परंतु कर्तव्यासमोर त्यांच्या व्यक्तीगत समस्या गौण झालेल्या आहेत. लॉकडाउन सुरु झाल्यापासून अनेक महिला पोलीस शिपाई आपल्या कुटूंबाला भेटायला जावू शकल्या नाही तर काही महिला पोलिसांनी आपल्या छोट्या बालकांना आपल्या कुटूंबाच्या भरवशावर सोडून सतत कर्तव्य बजावित आहेत.
कुटुंबापेक्षा देशाप्रती कर्तव्य महत्त्वाचे
एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांने सांगीतले की तिची तीन वर्षाची मुलगी असून शिक्षक पतीने सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ती आपल्या लहान मुलीला घेऊन आपले कर्तव्य बजावत असते. एवढेच नव्हे तर आपल्या एका विधवा बहिणीला तिने आसरा दिलेला आहे. जीवनात प्रचंड वादळ आले तरी ती पोलीस शिपाई म्हणून आपले कर्तव्य आनंदाने पार पाडत असते. एका महिला पोलिस कर्मचाºयांनी सांगितले की त्यांच्या दोन छोट्या मुली असून दोन्हीचा सांभाळ करीत कुटुंबाची सुध्दा काळजी घ्यावी लागते. पोलीस म्हणून कर्तव्य पार पाडण्याचे यशस्वी प्रयत्न सुरु असतात. त्यांना आपल्या मुलाबाळांची काळजी कुटूंबाची काळजी, घरगुती कामे आवश्यक गरजांची पुर्तता या सर्व गोष्टी नियमित करीत पोलीस म्हणून वेळेवर सदैव तत्पर रहावे लागते.
कर्तव्याचा आनंद मोठा
लोकमत प्रतिनिधीने काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तीगत समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगीतले की कौटुंबीक समस्या किंवा व्यक्तिगत समस्या असल्यातरी कर्तव्यावर असताना जो आनंद मिळतो तो फार वेगळा असल्याचे सांगितले.
सतत १२ तास रस्त्यावर नाकेबंदी
सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत सतत १२ तास रस्त्यावर उभे राहून नाकाबंदी करीत आपले कर्तव्य बजावंताना महिला पोलीस आपल्या नोकरी व देशाला समर्पीत झालेले दिसून येतात. नाकाबंदी करीत असताना विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांना उत्तम प्रकारे समजावणे तसेच कोरोना संसर्ग होण्याची भिती कशी असून शकते याबद्दल सुध्दा लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम या महिला पोलीस शिपाई करीत आहेत.