लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डीजे वाजविण्यावर बंदी असूनही शासन नियम धाब्यावर बसविण्याचे काम सुरू असून, डीजेच्या कर्णकर्कश दणदणाटामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे ज्येष्ठांसह चिमुकल्यांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. डीजेमुळे रात्रीच्या वेळी झोपमोड करीत हैराण केले जात आहे. जोरदार डीजे वाजवला जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या सायलेंट झोनमध्ये देखील कुठल्याही कारवाईची तमा न बाळगता सर्रास डीजे वाजविला जात आहे.
या प्रकाराला आळा घालण्याचे धाडस कोण दाखविणार, हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. सध्या लग्नसराई, हळद, वाढदिवस, मिरवणुकीत पारंपरिक वाद्याऐवजी डीजेचा कर्णकर्कश आवाज नागरिकांच्या कानावर आदळत आहे. लग्नसराईमुळे गल्लोगल्लीत डीजेचा आवाज घुमू लागला असून, त्यामुळे विविध आजारांच्या रुग्णांना त्रास होत आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे छाती धडधडणे आणि श्वासावरचे नियंत्रण सुटण्याच्या तक्रारी आता समोर येऊ लागल्या आहेत. शास्त्रीय दृष्टिकोन पाहता या ध्वनी लहरींच्या कंपनामुळे मुक्या प्राण्यांनाही त्रास होत आहे.
शांतता होतेय भंग
- विवाह समारंभ व कार्यक्रम असलेल्या परिसरातील शांतता सातत्याने कमी होत आहे. मात्र, यावर प्रशासनाने तोंडावर बोट ठेवल्याने याविरुद्ध ओरड करणार तरी कोण, प्रश्न नागरिकांना पडला आहे.
- लग्नसराईमुळे सध्या डीजेचा २ धुमाकूळ सुरू असून, शहरातील रुग्णालयांच्या परिसरातही सर्रास मोठ्या आवाजात डीजे वाजविले जात आहेत. पूर्वी नवरदेवाची वरात पारंपारिक वाद्या वाजवून वाजत-गाजत निघत होती. मात्र आज त्याची जागा डीजेने घेतली आहे.
- मात्र, हल्ली भेसूर व दणदणाटात निघते. यामुळे पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. डीजेमुळे सनई-चौघडा, लेझीम, ढोल, ताशा, झांज आदी पारंपरिक वाद्ये लुप्त होत चालले आहेत.
"ध्वनिप्रदूषण नियम धाब्यावर बसवून वाजविणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी डीजेचा दणदणाट असेल तिथे जाणेच टाळले पाहिजे. सुजाण नागरिकांनीही डीजेला नकार दिला पाहिजे."-दुलिचंद बुद्धे, सामाजिक कार्यकर्ता