‘मुंबई से निकले मगर रजेगाव की सीमापर अटके ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:32+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मागील दोन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगधंदे व रोजगाराची साधने संपूर्ण ठप्प पडली आहेत. याचा सर्वाधिक फटका मजुरांना बसला आहे. मजुरांच्या हाताला कामाला नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला.

‘Departed from Mumbai but stuck at Rajegaon border’ | ‘मुंबई से निकले मगर रजेगाव की सीमापर अटके ’

‘मुंबई से निकले मगर रजेगाव की सीमापर अटके ’

Next
ठळक मुद्देतीन दिवसांपासून अडकले शेकडो मजूर : पवानगी न मिळाल्याने समस्या, प्रशासन दखल घेणार का आमची?

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रोजगारासाठी मुंबई येथे गेलेले मजूर लॉकडाऊनमुळे आपल्या स्वगृही परतत आहे. दरम्यान मुंबईहून पायीच मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यात जाण्यासाठी निघालेल्या मजुरांना महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या गोंदिया जिल्ह्यातील रजेगाव येथील सीमेवर मागील तीन दिवसांपासून रोखून ठेवण्यात आले. या मजुरांना मध्यप्रदेशात परतण्यासाठी तेथील सरकारने परवानगी दिली नसल्याने या शेकडो मजुरांचा मागील तीन दिवसांपासून येथेच मुक्काम आहे. त्यामुळे मुंबई से निकले मगर रजेगाव सीमापर अटके अशीच त्यांची अवस्था झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मागील दोन महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगधंदे व रोजगाराची साधने संपूर्ण ठप्प पडली आहेत. याचा सर्वाधिक फटका मजुरांना बसला आहे. मजुरांच्या हाताला कामाला नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला.
रोजगार नसल्यामुळे मुंबई, पुणे येथे रोजगारासाठी गेलेले मजूर आता आपल्या गावाकडे परतत आहे. शासनाने मजुरांना त्यांच्या स्वगृही पोहचविण्यासाठी रेल्वे गाड्या आणि बसेसची व्यवस्था केली असली तरी बरेच मजूर अद्यापही रेल्वे मार्गाने पायीच येत आहे. असेच मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील शेकडो मजूर मुंबईहून पायी आपल्या राज्यात जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांना मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राची सीमा असलेल्या रजेगाव सीमेवर मागील तीन दिवसांपासून त्यांच्याकडे परवानगी नसल्याने थांबवून ठेवण्यात आले आहे.
या मजुरांसोबत त्यांचे कुटुंबीय असून यात गर्भवती महिला आणि लहान बालकांचा सुध्दा समावेश आहे. तब्बल दहा ते पंधरा दिवस पायी प्रवास करुन व हालअपेष्टा सहन करुन हे मजूर आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहचले. सीमेवर पोहचल्यानंतर आता आपण आपल्या राज्यात पोहचू असा या मजुरांना आत्मविश्वास होता.त्यामुळे दहा ते बारा दिवस पायी चालून आल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यांवर थकवा जाणवित नव्हता. मात्र मध्यप्रदेशाची सीमा असलेल्या रजेगाव नाक्यावर या सर्व मजुरांना पोलिसांनी अडविल्यानंतर या सर्व मजुरांचे चेहरे हिरमुसले. आपल्या राज्यात जावू देण्यासाठी मजुरांसह त्यांचे कुुटुंबीय पोलिसांना याचना करीत होते. मात्र नियमामुळे पोलिसांना सुध्दा त्यांची मदत करता आली नाही. परिणामी हे मजूर मागील तीन दिवसांपासून येथेच अडकले आहे.

मजुरांच्या जेवण आणि राहण्याची केली व्यवस्था
मुंबईहून पायी आलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील मजुरांकडे परवानगी पासेस नसल्याने त्यांना रजेगाव येथील सीमेवरच थांबवून ठेवण्यात आले आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यासाठी राहण्यासाठी टेंट आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच या मजुरांना मध्यप्रदेशात प्रवेश देण्यासाठी तेथील प्रशासनाची परवानगी मागण्यात आली असून परवानगी मिळाल्यानंतर त्यांना त्यांच्या राज्यात पोहचविले जाणार असल्याचे रजेगाव सीमेवर नियुक्त अधिकाऱ्यांनी सांगितले.

हजार दीड हजार किमीचा पायी प्रवास करुन आम्ही इथपर्यंत पोहचलो. आपल्या राज्याच्या सीमेजवळ पोहचल्याने आता आपण घरी पोहचू अशी अपेक्षा होती. मात्र मागील तीन दिवसांपासून येथेच अडकून पडलो आहे. प्रशासनाने आम्हाला आमच्या राज्यात जाण्याची परवानगी द्यावी.
- प्रमिला उरकुडे,
कटंगी, मध्यप्रदेश (मजूर)
प्रशासनाने मागील तीन दिवसांपासून आम्हाला रजेगाव सीमेवर थांबवून ठेवले आहे. आमच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र आमचे कुटुंबीय घरी काळजीत असून आम्हाला आमच्या राज्यात जाण्याची परवानगी द्यावी.
- दुर्गेश बेरवे,
मध्यप्रदेश (मजूर)

Web Title: ‘Departed from Mumbai but stuck at Rajegaon border’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.