लॉकडाउनमुळे शेतातच वाळली काकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:27+5:30

तालुक्यातील रेंगेपार, खडकी, बाम्हणी, चिखली येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली आहे. सुदैवाने यंदा काकडीचे पीक सुध्दा चांगले आहे. दरवर्षी मार्चपासून काकडीला लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी मोठी मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे राज्यात २५ मार्चपासून लॉकडाऊन आहे.परिणामी उद्योग धंदे, बाजारपेठा सर्वच बंद असून लग्न समारंभ देखील रद्द झाले आहे.

Cucumber dried in the field due to lockdown | लॉकडाउनमुळे शेतातच वाळली काकडी

लॉकडाउनमुळे शेतातच वाळली काकडी

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : लागवडखर्च भरुन निघणे झाले कठीण, आर्थिक मदतीची अपेक्षा

राजेश मुनिश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. आठवडी बाजार देखील बंद असून लग्न समारंभ व सर्वत्र कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. यामुळे भाजीपाल्यासह इतर शेतमालाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. याचाच फटका तालुक्यातील काकडी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे काकडीची मागणी घटल्याने शेतातच काकडी वाळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
तालुक्यातील रेंगेपार, खडकी, बाम्हणी, चिखली येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काकडीची लागवड केली आहे. सुदैवाने यंदा काकडीचे पीक सुध्दा चांगले आहे. दरवर्षी मार्चपासून काकडीला लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी मोठी मागणी असते. मात्र यंदा कोरोनामुळे राज्यात २५ मार्चपासून लॉकडाऊन आहे.परिणामी उद्योग धंदे, बाजारपेठा सर्वच बंद असून लग्न समारंभ देखील रद्द झाले आहे. त्यामुळे काकडीला बाजारपेठेत मागणीच नसल्याचे चित्र आहे. याचा फटका मात्र काकडी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. रेंगेपार येथील शेतकरी लहू डोंगरवार यांच्या पाच एकर शेतीत काकडीची लागवड करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगले उत्पन्न घेऊ, या आशेवर असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शेतातील काकडी शेतात राहिली.मागणी नसल्याने शेतकऱ्यांनी न तोडल्याने ती शेतातच वाळली.
त्यामुळे त्यांनी काकडी लागवडीसाठी केलेला खर्च देखील वाया गेला. त्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. आता काहीच उत्पन्न हाती येणार नसल्याने बँकेचे कर्ज आणि उधार उसणवारी घेतलेल्या पैशाची परतफेड कुठून करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. तर शेतात बहरुन आलेले काकडीचे पीक पूर्णपणे मातीमोल होत असल्याचे शेतकऱ्यांना पाहयला मिळत असल्याने त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळत आहेत. काकडीचे उत्पादन घेण्यासाठी वर्षभर घेतलेली मेहनत सुध्दा पूर्णपणे व्यर्थ गेली आहे.

शासनाकडून मदतीची अपेक्षा
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाजीपाला, काकडीसह इतर शेतमालाला मागणीच नसल्याने शेतकऱ्यांना ते फेकून द्यावे लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांची दखल घेवून त्यांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.

गेल्यावर्षी मी पाच एकर शेतीत काकडीची लागवड करुन पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे काकडी मागणी नसल्याने शेतातच काकडी सडत आणि वाळत चालली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.
- लहू डोंगरवार, शेतकरी रेंगेपार
..................................................
रेंगेपार परिसरात बाराशे एकर शेतीत काकडी, टरबूज ,खरभूज, दोडका, कारली, ऊस आदी पिकांची लागवड केली जाते. माझ्याकडे सध्या ३६ एकरात ऊस व एक एकरात काकडी पिकाची लागवड केली आहे. मात्र मागणी नसल्याने हा माल शेतातच पडून आहे.
- प्रभू डोंगरवार, प्रगतीशील शेतकरी रेंगेपार.

Web Title: Cucumber dried in the field due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.